आज रविवारची सुट्टी आहे आणि आज वेळ कसा घालवावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही घरबसल्या एक उत्तम सिनेमा पाहू शकता. खरं तर आजकाल प्रत्येक दुसऱ्या सिनेमात ॲक्शन, सस्पेन्स पाहायला मिळतो. पण आम्ही आज तुम्हाला अत्यंत शांत आणि प्रभावी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.७ रेटिंग मिळाले आहे. इतकंच नाही तर याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. जर तुम्हाला हटके, वास्तविक विषयांवरचे सिनेमे पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायला हवा.
काय आहे चित्रपटाचे नाव?
या चित्रपटाचे नाव ‘कडैसी विवासयी’ (Kadaisi Vivasayi) असं आहे. ‘कडैसी विवासयी’ चा अर्थ ‘शेवटचा शेतकरी’ असा होतो. ‘काका मुत्तई’ सारखा उत्कृष्ट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक एम. मणिकंदन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘कडैसी विवासयी’ चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा उसीलमपट्टी मधील एका छोट्या गावातील आहे. या गावात दुष्काळ पडतोय आणि जमिनी विकल्या गेल्या आहेत, त्यामुळे जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलंय. पण गावातील मंदिराच्या एका धार्मिक विधीसाठी तिथेच पिकवलेल्या तांदळाची गरज असते. अशा परिस्थितीत संपूर्ण गाव ८० वर्षांच्या ‘मायंदी’ यांच्याकडे आशेने पाहतं, कारण तेच त्या गावातील शेवटचे शेतकरी असतात. जेव्हा अत्यंत साधेभोळे मायंदी एका विचित्र कायदेशीर कचाट्यात अडकतात, तेव्हा ही कथा तेव्हा एक रंजक आणि भावनिक वळण घेते.
कलाकारांचा दमदार अभिनय
या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातील मुख्य कलाकार नल्लांदी हे आहेत. ते व्यावसायिक अभिनेते नसून एक वृद्ध शेतकरी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, त्यांचं हळूच हसणं आणि कोणत्याही फिल्मी ड्राम्याशिवाय फक्त आपल्या कामावर प्रेम करणं तुमचं मन जिंकून घेईल. त्याचबरोबर यात विजय सेतुपतीने देखील अत्यंत दमदार भूमिका साकारली आहे.
‘कडैसी विवासयी’ चित्रपट काय संदेश देतो?
हा चित्रपट तुम्हाला शेतकऱ्यांचा आदर करा अशी थेट शिकवण देत नाही. तर, एका शेतकऱ्यासाठी शेती हा व्यवसाय नसून, त्याच्या श्वासासारखी महत्त्वाची गोष्ट आहे हे यात दाखवून दिलंय. आधुनिक शेतीमधील त्रुटी, कॉर्पोरेट कंपन्यांचा कीटकनाशकांचा खेळ आणि आपली संथ न्यायालयीन व्यवस्था यावर कोणताही कोणताही आरडाओरडा करणारा डायलॉग न वापरता, केवळ दृश्यांच्या माध्यमातून या चित्रपटाने जळजळीत प्रकाश टाकला आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायचा ‘कडैसी विवासयी’?
‘कडैसी विवासयी’ या चित्रपटाला ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटा’चा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट तुम्ही सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा चित्रपट हिंदी किंवा मराठीत उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हाला तो हिंदी/इंग्रजी सबटायटल्सबरोबर पाहावा लागेल.
