नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०१८ मध्ये ‘लस्ट स्टोरीज’ नावाची एक ॲंथोलॉजी फिल्म प्रदर्शित झाली होती. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चार वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स एकत्रित करून सादर केलेला हा चित्रपट तेव्हा प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला होता. एका स्त्रीकडे केवळ भोगवस्तू म्हणून न पाहता तिच्या इच्छा, अपेक्षा यांचं थोडं विनोदी तर थोडं गंभीर अंगाने चित्रण केलेला हा चित्रपट चांगलाच गाजला.
खासकरून चित्रपटातील बोल्ड सीन्सची प्रचंड चर्चा झाली, अभिनेत्री कियारा आडवाणीचा वायब्रेटरचा सीन तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. पुन्हा याच संकल्पनेवर बेतलेला याच चित्रपटाचा पुढचा पार्ट म्हणजेच ‘लस्ट स्टोरीज २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.




५० सेकंदांच्या टीझरमध्ये असलेल्या काही संवादांवरूनच हा चित्रपट आणखी बोल्ड असणार आहे याची कल्पना आली आहे. “जसं गाडी घेताना आपण टेस्ट ड्राइव्ह घेतो तसंच लग्नाआधीसुद्धा टेस्ट ड्राइव्ह महत्त्वाची असते.” हा संवाद आपल्याला टीझरच्या सुरुवातीला ऐकायला मिळतो. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की नेमकं यातून कशावर भाष्य केलं जाणार आहे.
टीझरमध्ये चित्रपटाच्या कथानकाबद्दल फार विस्तृत काही सांगितलं नसलं तरी यातही चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आर बल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा हे ४ दिग्दर्शक या कथा आपल्यासमोर सादर करणार आहेत. शिवाय यात काजोल, नीना गुप्ता, तिलोत्तमा शोम, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, अमृता सुभाष, विजय वर्मा, कुमुद मिश्रा, अंगद बेदी यांच्यासारखे नाणावलेले कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २९ जून रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.