कमल हासन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इंडियन’ हा चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाल्यानंतर या प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता २०२४ मध्ये या चित्रपटाचा सीक्वेल ‘इंडियन २'( Indian 2) प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र तसे घडताना दिसले नाही. १२ जुलैला चित्रपटगृहात दाखल झालेला हा चित्रपट आता महिना पूर्ण होण्याआधीच ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘इंडियन २’ हा चित्रपट ९ ऑगस्टला ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. ‘इंडियन’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन दशकांनंतर या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये कमल हासन यांच्याबरोबरच सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. एस. शंकर यांच्या ‘इंडियन २’मध्ये कमल हासन हे सेनापती व चंद्रू या दुहेरी भूमिकांमध्ये दिसले आहेत. ‘इंडियन २’ला प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले; मात्र त्यानंतर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात यश मिळू शकले नाही.

हेही वाचा: Video: ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी फ्रेंडशिप डेच्या अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

‘इंडियन २’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तमीळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. परंतु, नेटफ्लिक्सवरील या चित्रपटाच्या हिंदी भाषेतील उपलब्धतेबाबत ओटीटी प्लॅटफॉर्मने कोणतीही स्पष्टता दिली नाही. त्यामुळे हा चित्रपट हिंदी भाषेत कधी प्रदर्शित होणार, याबद्दल नेटकरी विचारणा करताना दिसत आहेत.

कमल हासन यांचा हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी ‘इंडियन ३’साठी इंडियन २ या चित्रपटाची निर्मिती केले असल्याचे म्हटले आहे. एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहानंतर ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २५० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४७ कोटींची कमाई केली आहे. आता ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट कमाल दाखवू शकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.