Kangana Ranaut in Lock Upp 2 : अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी ‘लॉक अप’च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन केले होते. त्यांची परखड मते आणि स्पर्धकांना स्पष्टपणे सुनावणे यांमुळे हा शो प्रचंड गाजला होता. दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेता रितेश देशमुख व निर्माती फराह खान या शोला होस्ट करीत आहेत. मालिका विश्वामध्ये प्रसिद्ध असलेले राम कपूर यांनी शोमध्ये सातत्याने उलट उत्तरे दिल्याने कंगना या चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. आता दुसऱ्या सीझनच्या पाचव्या एपिसोडमध्ये त्या सहभागी झाल्या असून, त्यांनी राम कपूर यांच्या वागणुकीवरून त्यांना फटकारले आहे. तसेच धीरज धूपरलाही सुनावले आहे. या एपिसोडचा टीझर प्रदर्शित झाला असून, नेटकऱ्यांना कंगना यांचा धडाकेबाज अंदाज पसंतीस उतरला आहे. कंगना रणौत यांचा ‘लॉक अप २’चा टीझर तुफान व्हायरल होत आहे.

‘लॉक अप २’ शोमधील ‘जजमेंटल डे’च्या टीझरमध्ये कंगना रणौत यांनी राम कपूर व धीरज धूपर यांना स्पष्ट व कठोर शब्दांत फटकारले. विशेषतः राम कपूर यांच्या वागणुकीवर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “राम, हा खेळ एवढा गांभीर्यानं घ्यायचा नव्हता आणि जर तुम्हाला वाटत असेल की, या तुरुंगापेक्षा तुम्ही खूप श्रेष्ठ आहात, तर तुम्ही इथे आलाच कशाला? तुमच्यामध्ये असलेली असभ्यता (फूहडपन) दाखवायला?” कंगना रणौत यांच्या वाक्यामध्ये त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. त्यावर राम कपूर म्हणाले, “जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा सत्य स्वीकारेन, आणि तेही इथल्या इतर कोणाहीपेक्षा चांगल्या प्रकारे स्वीकारेन.”

तुझ्यामध्ये शाहरुखचा ‘एस’सुद्धा नाहीये – कंगना

राम कपूर यांनी दिलेल्या उत्तरावरही कंगनाने संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा आहे, तर स्वतःचा असा बचाव करणं थांबवा.” तसेच कंगना रणौत यांनी धीरज धूपर यालाही त्याच्या खेळावरून फटकारले आहे. त्या म्हणाल्या, “धीरज, तू स्वतःला शाहरुख खान म्हणवून घेतोस; पण खरं तर तुझ्यामध्ये शाहरुखचा ‘एस’सुद्धा नाहीये. तू महत्त्वाचा आणि मुख्य वाटेल असं काहीही दिसत नाही. बाजूला राहून फक्त बाजूला पडला आहेस, साईडलाईन झाला आहेस,”

राम कपूरचे लग्नातील फसवणुकीबद्दल वक्तव्य चर्चेत

‘लॉक अप २’च्या एका एपिसोडमध्ये राम कपूर यांनी वैवाहिक जीवनातील फसवणुकीबद्दल एक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. राम कपूर म्हणाले, “जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरं प्रेम करत असाल, तर कोणतंही नातं तुटू शकत नाही. लग्न हे खूप आव्हानात्मक असतं.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, कठीण काळात जोडीदाराकडून चूक झाली तरी जर त्याचं आपल्या पत्नी आणि मुलांवर प्रेम असेल, तर वेळ सर्व जखमा भरून काढतं. कधी कधी फसवणूक नकळतपणे होते.”