Kapil Sharma open The Kaps Cafe: कपिल शर्मा हा त्याच्या विनोदी कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमांतून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
कपिल शर्मा सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सीझन ३ चे सूत्रसंचालन करीत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी होतात. त्यांच्यावर होणारे विनोद, कलाकारांची वक्तव्ये, खळखळून हसवणारा विनोदी कार्यक्रम म्हणून या शोची लोकप्रियता मोठी आहे. तसेच, कपिल शर्माचा चाहतावर्गही मोठा आहे.
कपिल शर्माच्या कॅफेचे नाव काय?
आता अभिनेता त्याच्या अभिनय क्षेत्रातील कामामुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कपिल शर्माने पत्नीसह कॅनडामध्ये एक कॅफे सुरू केला. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे(Surrey) शहरात पत्नी गिन्नी चतरथबरोबर कॅफे सुरू केला आहे. नुकतेच या कॅफेचे उदघाटन झाले. द कॅप्स कॅफे (The Kaps Cafe) असे या कॅफेचे नाव आहे. कॉफीसह या कॅफेमध्ये विविध पदार्थदेखील मिळतात. लेमन पिस्ता केक, ब्राउनीज व क्रोइसंट हे पदार्थ कपिलच्या कॅफेमध्ये मिळतात.

द कॅप्स कॅफेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये उदघाटनावेळी पाहुण्यांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. गर्दी झालेली असताना तुम्ही दाखविलेल्या संयमाबद्दल आम्ही आभारी आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने पाठिंबा दाखविला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. याबरोबरच, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कपिलच्या कॅफेमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे.
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामलादेखील या कॅफेचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या कॅफेसाठी ज्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कॉमेडियन किकू शारदानेदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ती पोस्ट कपिलने त्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिपोस्ट केली आहे. किकूदेखील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कपिल शर्माबरोबर काम करताना दिसतो.
कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझन सुरुवात झाली आहे. दर शनिवारी या शोचा एक भाग प्रदर्शित होतो. तिसऱ्या सीझनच्या तिसऱ्या शोमध्ये युजवेंद्र चहल, अभिषेक शर्मा, गौतम गंभीर, ऋषभ पंत हे क्रिकेटर सहभागी झाले होते. पहिल्या भागात सलमान खान, तर दुसऱ्या भागात मेट्रो इन दिनों चित्रपटाच्या संपूर्ण कास्टने या शोमध्ये हजेरी लावली होती. आता पुढील भागात कोणते कलाकार हजेरी लावणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
या शोबरोबरच कपिल लवकरच – ‘किस किस को प्यार करूँ २’मध्ये दिसणार आहे. किस किस को प्यार करूँ या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा सीक्वेल असणार आहे.
कपिलच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे, तर त्याने गिन्नी चतरथबरोबर २०१८ ला लग्नगाठ बांधली. त्याला दोन मुले आहेत.