Kartavya Trailer Release: सैफ अली खान लवकरच कर्तव्य या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या रसिका दुग्गल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान या सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने सिनेमाची निर्मिती केली असून कर्तव्य सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘कर्तव्य’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुंबईत नुकताच ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. ट्रेलरमध्ये सैफ अली खानचे पात्र पाहायला मिळते. त्याने पवन ही भूमिका साकारली आहे. तो एका पत्रकाराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतो. त्यानंतर त्याच्या चौकशीची मागणी होते. कारण त्याच्या देखरेखीखाली त्या पत्रकारावर गोळीबार होतो. त्याच वेळी, त्याचे वैयक्तिक आयुष्यही विस्कळीत होऊ लागते. पवन व्यवस्थेच्या दबाव आणि घरातील संघर्ष यांच्यात अडकतो. ट्रेलरच्या शेवटी तो स्वतःचा स्वाभिमान, कर्तव्य आणि कुटुंब यांपैकी काय निवडायचं या द्वंद्वात अडकलेला दिसतो.

नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर कर्तव्यचा ट्रेलर शेअर केला आणि लिहिले की प्रत्येक निर्णय हे आव्हान आहे. कर्तव्य हा सिनेमा १५ मे २०२६ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सैफ अली खान कर्तव्यमधील त्याच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “पवन हा असा माणूस आहे जो सतत स्वतःशीच संघर्ष करत असतो. त्याला जे योग्य वाटतं, समाज आणि व्यवस्थेच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा, आणि त्याने कशाचे संरक्षण केले पाहिजे ज यांच्यामध्ये तो अडकलेला आहे. ‘कर्तव्य’ची खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट सोपी उत्तरं देत नाही. तो तुम्हाला अस्वस्थ करतो, प्रत्येक निर्णयाची वैयक्तिक किंमत मोजावी लागली तर तुम्ही काय कराल, हा प्रश्न विचारायला भाग पाडतो.”

अभिनेता असेही म्हणाला, “सिनेमाचे दिग्दर्शक पुलकित आणि चित्रपटांतील संपूर्ण कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप उत्तम होता. त्यांच्यामुळे हा प्रवास आणखी रंजक झाला. विशेषतः ‘कर्तव्य’सारख्या अनेक बाजू असलेल्या प्रोजेक्टसाठी पहिल्यांदाच रेड चिलीज एंटरटेनमेंटबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. जगभरातील प्रेक्षकांना ही गोष्ट नेटफ्लिक्सवर अनुभवायला मिळणार आहे. यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

सैफ अली खानने २०१८ मध्ये ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले होते. यामध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. आता सात वर्षांनंतर अभिनेता पुन्हा एकदा ओटीटीवर पोलिसाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दरम्यान, या सिनेमात सैफ अली खानबरोबर रसिका दुग्गल, संजय मिश्रा, झाकिर हुसैन व मनीष चौधरी हे कलाकार दिसणार आहेत.