This Bollywood Movie Is Trending On OTT : हल्ली चित्रपटगृहांत एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की, तो ओटीटीवर कधी येणार याची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता असते. त्यात बऱ्याचदा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले चित्रपट ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात आणि प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा होऊ लागते.
काही दिवसांपूर्वी मराठमोळ्या समीर विद्वांस दिग्दर्शित हिंदी चित्रपट सिनेमागृहांत रिलीज झालेला. त्यामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकांमध्ये होते. डिसेंबर २०२५ मध्ये ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट रिलीज झालेला. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला. निर्मात्यांना अपेक्षित असलेला प्रतिसाद त्याला मिळाला नाही. करण जोहरने त्याची निर्मिती केली होती.
कुठे पाहायचा?
कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट आता ट्रेंडिंगवर आहे. चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. चित्रपटाचे बजेट मोठे असूनही त्याचे अधिक मार्केटिंग न केल्यामुळे चित्रपट चालला नाही, असे म्हटले जातंय. काही दिवसांपूर्वी ओटीटीवर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर मात्र चित्रपटाबद्दलचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलला. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आता ते चित्रपटाचं कौतुक करत आहेत.
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार या चित्रपटाने भारतात ३० कोटींची आणि जगभरात ४८.०२ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ९० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे मोठे नुकसान झाले असून बजेटच्या अर्धे पैसेसुद्धा मिळालेले नाही. परंतु, आता ओटीटीमुळे चित्रपटांना दुसरी संधी मिळत आहे. सध्या ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या टॉप १० मधील यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कार्तिक आर्यन व अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ हा चित्रपट आजच्या काळातील रिलेशनशिपवर आधारित असून, हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनने रे या वेडिंग प्लॅनरची भूमिका साकारली आहे; तर अनन्या पांडेने रुमी ही भूमिका साकारली आहे. दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या नात्यात संकोच असतो; परंतु नंतर त्यांना एकमेकांप्रति भावना निर्माण होतात. पुढे रे रुमीला तिच्या वडिलांची प्रकृती ठीक नसताना मदत करतो.
