Kashmera Shah post for Sunita Ahuja : अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या ‘लॉक अप २’मध्ये सहभागी झाल्या आहेत. पहिल्या एपिसोडपासून सुनीता या चर्चेमध्ये आल्या असून त्यांच्या खेळाला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. मात्र, शोमध्ये देण्यात आलेल्या कमी दर्जाच्या जेवणावरून सुनीता यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व स्पर्धक उपाशी असल्यामुळे सुनीता यांचा राग अनावर झाला. त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली, तसेच यावेळी त्या रडलेल्या दिसून आल्या. सुनीता आहुजा या ‘लॉक अप’मध्ये भावनिक झाल्यानंतर कश्मीरा शाह हिने खास इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.
कौटुंबिक वादामुळे अनेक वर्षे सुनीता आहुजा यांचा भाचा कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मीरा अभिषेक यांच्याबरोबर अबोला होता. लाफ्टर शेफ या शोमध्ये हा वाद संपला असून अनेक वर्षांनंतर सुनीता, कश्मीरा व कृष्णा हे एकत्रित दिसून आले होते. यानंतर आता सुनीता ‘लॉक अप २’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. सातव्या दिवशी सुनीता यांचा अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांनी सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यासमोर दुःख व्यक्त केले. तसेच त्यांनी शो सोडून घरी जाण्याची इच्छाही व्यक्त केली. यानंतर आता कश्मीरा शाह हिने सुनीता आहुजा यांच्यासाठी खास पोस्ट केली असून ‘लाफ्टर शेफ’मधील खास फोटो शेअर केले आहेत.
कश्मीरा शाहच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
कश्मीरा शाह हिने पोस्टमध्ये लिहिले, “मामी, तुम्ही खंबीर राहा. तुम्ही एकट्या नाही, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. कोणालाही कमी लेखू देऊ नका. खऱ्या आयुष्यात असो किंवा कॅमेऱ्यासमोर, तुम्ही जशा आहात तशा राहा; जो कोणी तुम्हाला त्रास देत असेल त्याला तितक्याच ताकदीने उत्तर द्या. खरा नरक कसा असतो हे त्यांना दाखवाच.”
पुढे तिने लिहिलं, तुमचे रक्षण करण्यासाठी ‘डेव्हिल्स एंजल’ कायम तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही किंवा खाली खेचू शकणार नाही याचं मी वचन देते. मला माहीत आहे, तुम्ही त्यांना चोख उत्तर देऊ शकता. पण, फक्त घरी परत यायचे आहे म्हणून तुम्ही शांत आहात. माझं म्हणणं एवढंच आहे की, तिथे ठामपणे उभ्या राहा, हार मानू नका आणि जे तुम्हाला त्या शोमध्ये त्रास देत आहेत, त्यांनाच त्यांच्या वागण्याची जाणीव करून द्या. आमचे कायम आणि नेहमीच तुमच्यावर प्रेम आहे.”
स्पर्धकांसाठी पाठवण्यात आलेल्या जेवणामुळे सुनीता आहुजा संतापल्या होत्या. इतर स्पर्धकांप्रमाणेच त्यांनीही खराब जेवण खाण्यास नकार दिला. सुनीता यांनी पुढे शिवीगाळ करत अर्वाच्च भाषेमध्ये राग व्यक्त केला. सुनीता म्हणाल्या, “विरोध करत नसल्यामुळे हे असे केले जात आहे. आता आम्हाला अन्नासाठी भीक मागावी लागेल का? तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर उभे राहिले पाहिजे. माझी सर्व मुलेही भुकेली आहेत. या सूपची चव गोमूत्रासारखी आहे, त्यात थोडी घाणही मिसळली आहे.”
