KD The Devil OTT Release Date : ओटीटीवर नेहमीच एकापेक्षा एका अशा सीरिज प्रदर्शित होत असतात. विविध जॉनरमधून वेगवेगळे आणि धाडसी विषय हाताळले जातात. त्यामुळे ओटीटीला हल्ली अधिक पसंती मिळत असून ओटीटी आता महत्त्वाचं मनोरंजनाचं माध्यम झालं आहे. अशातच अलीकडे अनेक सीरिज, चित्रपट रिलीज झाले असून आता येत्या काळातही काही प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचा ‘केडी द डेव्हिल’ हा सिनेमा.
संजय दत्त अलीकडे अनेक वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या प्रत्येक कलाकृतीमधील भूमिकेतून त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. गेल्या काही काळात अनेकांच्या चर्चेचा विषय असलेले ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ हे चित्रपट त्यापैकीच एक. अशातच आता अभिनेत्याचा काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झालेला ‘केडी द डेव्हिल’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
कधी व कुठे पाहायचा?
KD: The Devil हा ध्रुव सरजा आणि संजय दत्त यांचा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. KD: The Devil हा चित्रपट ५ जून २०२६ पासून ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५वर रिलीज होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती चित्रपटाच्या टीमने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे.
या चित्रपटाची कथा काली दास (KD) या बेफिकीर आणि अशिक्षित तरुणाभोवती फिरते. जो खूप आनंदी स्वभावाचा असतो आणि त्याच्या कुटुंबावर त्याचं खूप प्रेम असतं. मात्र, त्याचा मोठा भाऊ धर्म सतत त्याचा अपमान करत असतो. त्यामुळे काली मोठा झाल्यावर ‘धक देवा’ या भयंकर डॉनला आपला आदर्श मानू लागतो. धक देवा असा गुंड असतो, ज्याला पोलीससुद्धा घाबरतात.
कालीच्या आयुष्यात एक आनंदाचा वळण तेव्हा येतं, जेव्हा तो माचू लक्ष्मीच्या प्रेमात पडतो. लक्ष्मी ही धाडसी आणि स्पष्टवक्ती मुलगी असते. तिचा बिनधास्त स्वभाव कालीच्या बेफिकीर व्यक्तिमत्त्वाशी अगदी जुळून जातो. पण त्यांचं हे प्रेम लवकरच फसवणूक आणि धोकादायक घटनांच्या जाळ्यात अडकतं. गैरसमज आणि काही घटनांनंतर कालीचं कुटुंब थेट ‘धक देवा’ (संजय दत्त) यांच्या निशाण्यावर असतं. काली त्याच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो का? या सगळ्या संकटांमध्ये तो त्याच्या प्रेमाला मिळवण्यात यशस्वी होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील.
