The Great Indian Kapil Show: कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या एका दशकाहून जास्त काळापासून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. आधी टीव्ही व आता थेट नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या माध्यमातून तो लोकांचं मनोरंजन करतोय. कपिलच्या टीममध्ये सुरुवातीपासून असणारा कॉमेडियन किकू शारदाने शोमधील एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली. हा शो किती स्क्रिप्टेड असतो आणि किती इम्प्रूव्हायझेशन केलं जातं, याचा खुलासा त्याने केला आहे.
सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावरचे खरेखुरे हावभाव टिपता यावेत, म्हणून टीम मुद्दामून त्यांना जोक्स किंवा पंचलाइन्स आधी सांगत नाही, असं किकू शारदा प्रखर गुप्ता यांच्याशी बोलताना म्हणाला. “आम्हाला सेलिब्रिटींच्या नैसर्गिक प्रतिक्रिया हव्या असतात. पाहुण्यांना पंचलाइन्स, जोक्स किंवा येणारी पात्रे आधीच माहीत नसतात. त्यांनी मंचावर पहिल्यांदाच त्या गोष्टींचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा असते, कारण तेव्हाच त्यांचे खरे हावभाव पाहायला मिळतात. त्यामुळे मंचावर प्रत्येक जण त्यांना सुचेल तशी साथ देत जातो.”
७० टक्के शो स्क्रिप्टनुसार चालतो – किकू शारदा
शोसाठी एक स्क्रिप्ट नक्कीच असते, पण शूटिंग दरम्यान गप्पा कशा पुढे रंगतात, त्यावर सगळं अवलंबून असतं. बरेचदा टीम स्क्रिप्टनुसार शो करत नाही. “थोडक्यात सांगायचं झाल्यास एक स्क्रिप्ट असते आणि आम्ही त्यानुसार काम करतो, पण जमेल तितकंच. म्हणजे काहीवेळा स्क्रिप्टनुसार जोक करणं शक्य नसतं. कारण एखादा सेलिब्रिटी सगळं संभाषणाला पूर्णपणे नवीन दिशेने घेऊन जातो. तर काहीवेळा त्याच क्षणी मनात एखादा वेगळा विचार येतो आणि आम्ही ऐनवेळी बदल करतो. माझ्या मते, हे प्रमाण साधारण ७० आणि ३० टक्के असे आहे. साधारण ७०% शो स्क्रिप्टनुसार चालतो, तर ३०% शो पूर्णपणे जे आम्हाला वेळेत सुचतं ते आम्ही बोलत असतो,” असं किकू शारदा म्हणाला.
सलमान खानबद्दल अंदाज लावणं कठीण – किकू शारदा
सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव किकूने सांगितला. त्याच्यामते, सलमान कोणत्या जोकवर कसा प्रतिसाद देईल याचा अंदाज लावणं कठीण असतं. “सलमान खानला नेमकी कोणती गोष्ट हसवेल, हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. काहीवेळा तुम्ही ‘हा डायलॉग खूपच विनोदी होईल’ असा विचार करून एखादी पंचलाइन तयार ठेवता, पण तो त्यावर फारशी प्रतिक्रिया देत नाही. आणि मग अचानक मध्येच कोणीतरी काहीतरी अनपेक्षित बोलून जातं आणि त्यामुळे तो पोट धरून हसू लागतो. एकदा का तो हसायला लागला की त्याला थांबवणं कठीण होतं. हसून हसून त्याच्या डोळ्यात पाणी येतं,” असं किकू शारदाने नमूद केलं.
एखादा जोक फ्लॉप ठरतो तेव्हा…
जेव्हा एखादा जोक प्रेक्षकांना हसवू शकत नाही, तेव्हा काय केलं जातं याबद्दल किकूने सांगितलं. “अशा परिस्थिती हाताळण्यात कपिल शर्मा एकदम पटाईत आहे. एखादा जोक हसवू शकत नाहीये, हे ओळखण्याची एक नैसर्गिक कला त्याच्याकडे आहे. मी नेहमी म्हणतो की, काहीवेळा एखादा विनोद खूप छान रंगतो, तर काहीवेळा तो फ्लॉप ठरतो. जेव्हा एखादा जोक चालत नाही, तेव्हा तो चालतोय असा आव आणत तुम्ही तिथे उगाच उभे राहू शकत नाही,” असं किकू शारदा म्हणाला.
कपिल अशा वेळी शोमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्याची विनोदीबुद्धी वापरतो. “कपिल लगेचच स्क्रिप्टच्या बाहेरचं काहीतरी बोलून मध्ये पडतो. तो कदाचित म्हणेल, ‘मी तुला आधीच सांगितलं होतं की हे चालणार नाही,’ किंवा अशी एखादी पंचलाइन मारेल ज्यामुळे समोरच्या कलाकाराला त्या परिस्थितीतून निघता येईल. शोमध्ये कोणताही अवघडलेपणा न आणता तो पुढे जाण्याचा मार्ग शोधतो. तो अशा परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळतो. तब्बल १३ वर्षे एकत्र काम केल्यानंतर, आम्ही आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे एकमेकांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला लगेच समजतं,” असं किकू शारदा म्हणाला.
