कोरियन सीरिज म्हणझे के ड्रामा आणि कोरियन चित्रपट यांची प्रेक्षकांमध्ये हल्ली प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं.कोरिया, कोरियन संस्कृती, तिथले लोक याबद्दल विशेषकरुन तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. त्यामुळे तिकडच्या कलाकृतींनाही भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. या कलाकृती पाहून आणि त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर अनेक जण कोरियाला जाण्याचं स्वप्न बघतात. अशताच लवकरच ओटीटीवर असाच एक चित्रपट येणार आहे ज्याला कोरियाला जायचं असतं.

या चित्रपटाचं नाव आहे ‘कोरियन कनकराजू’. तेलुगु सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. वरुण तेज शेवटचा ‘कोरियन कनकराजू’ याच हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर रितिका नायक मुख्य भूमिकेत होती. मर्लापाका गांधी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असून, कुठे व कधीपासून पाहता येईल याबद्दल जाणून घेऊया.

‘कोरियन कनकराजू’ ओटीटी रिलीज

‘कोरियन कनकराजू’ हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ पासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सच्या कॅटलॉगमध्ये चित्रपटाची माहिती अपडेट करण्यात आली असून, २ तास ४२ मिनिटांचा हा तेलुगू चित्रपट शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

‘कोरियन कनकराजू’ कथा काय आहे?

‘कोरियन कनकराजू’ या चित्रपटात वरुण तेजने कनकराजू ही भूमिका साकारली आहे. कनकराजू हा तापट स्वभावाचा, मात्र मनमोकळा आणि बेफिकीर तरुण आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तो पारंपरिक भजनी मंडळ चालवतो. कनकराजूचं चैत्रा नावाच्या मुलीवर प्रेम असतं. चैत्रा मोटर प्लांटमध्ये काम करते. तिचं दक्षिण कोरियात जाण्याचं स्वप्न असतं. कोरियन संस्कृती, के-पॉप आणि के-ड्रामाचं तिला विशेष आकर्षण असतं. मात्र, एका कोरियन व्यक्तीबरोबरच्या संबंधित विचित्र घटनेनंतर कनकराजूचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं.

कोरियन व्यक्तीचे पार्थिव घेऊन आलेल्या एका रहस्यमय जहाजामुळे एक विचित्र अपघात घडतो. कनकराजू त्या जहाजातील असलेलं पेय पितो आणि त्याच्यावर कोरियन व्यक्तीच्या आत्म्याचा कब्जा होतो. यानंतर जेव्हा जेव्हा कोणी कोरियाबद्दल बोलतं, तेव्हा कनकराजूमध्ये जबरदस्त वेग आणि मार्शल आर्ट्सची कौशल्यं दिसून येतात. त्याच्यात तलवारबाजीचं कौशल्यही विकसित होतं. मात्र, त्या आत्म्याी एक अपूर् राहिलेली इच्छा असते, जी केवळ दक्षिण कोरियातच पूर्ण होऊ शकते. पुन्हा आधी सारखं आयुष्य जगण्यासाठी कनकराजू, चैत्रा आणि त्याचा फोटोग्राफर मित्र कृष्णप्पा कोरियाला जातात. आत्म्याला नेमकं काय हवं आहे, याचा शोध घेऊन त्याचं अपूर्ण काम पूर्ण केल्यानंतरच कनकराजू त्याच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो.

‘कोरियन कनकराजू’मधील कलाकार

‘कोरियन कनकराजू’ या चित्रपटात वरुण तेज कोनिडेला आणि रितिका नायक मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सत्या, सुनील वर्मा, दक्ष नागरकर, व्हीटीव्ही गणेश, महेश अचंता, श्रीनिवास अवस्थरला यांच्यासह इतर कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहे.