ओटीटी प्लॅटफॉर्म्स आल्यानंतर प्रेक्षकांचे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचे प्रमाण कमी झाले. त्याचबरोबर आधी फक्त थिएटरमध्येच सिनेमे रिलीज व्हायचे, त्यामुळे एखादा चित्रपट फ्लॉप झाला की सगळं संपायचं. पण ओटीटीमुळे निर्मात्यांना बजेटची रक्कम वसूल करण्याची एक संधी मिळते. थिएटरमध्ये यशस्वी न होणारे काही चित्रपट ओटीटीवर कमाल करतात. अशाच एका चित्रपटाबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या चित्रपटाने थिएटरमध्ये बजेटच्या पाचपट जास्त कमाई केली होती. नंतर ओटीटीवरही त्याने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते.

या चित्रपटाचं नाव आहे ‘लापता लेडीज’. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शनने केली होती. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेल्या हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. ‘लापता लेडीज‘ हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. या चित्रपटाचं फार प्रमोशन केलं नव्हतं. तसेच सिनेमाचं बजेटही खूप कमी होतं. त्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप जास्त कलेक्शन केलं नव्हतं; पण बजेटच्या पाचपट कमाई केली होती.

‘लापता लेडीज‘ या चित्रपटाचं बजेट फक्त ४ ते ५ कोटी रुपये होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. खरं तर ‘लापता लेडीज’ चित्रपट प्रेक्षकांच्या माउथ पब्लिसिटीमुळे खूप गाजला होता. बॉक्स ऑफिसवर बजेट वसूल केल्यानंतर या चित्रपटाने ओटीटीवरही धुमाकूळ घातला होता.

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला लापता लेडीज

लापता लेडीज हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि २६ एप्रिल २०२४ रोजी तो नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सिनेमाची सशक्त कथा, सामाजिक संदेश आणि कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला. नेटफ्लिक्सवर बराच काळ लापता लेडीज ट्रेंडिंग होता. व्ह्यूअरशिपच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक मोठ्या बजेटच्या चित्रपटांना मागे टाकलं होतं. लापता लेडीज हा त्यावर्षी नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला होता.

कमी बजेटमध्ये बनवलेल्या लापता लेडीज या चित्रपटाने सिद्ध केलं की मोठे कलाकार आणि मोठ्या बजेटशिवायही एक चांगली कथा प्रेक्षकांची मनं जिंकू शकते. ग्रामीण भारतातील या चित्रपटाची कथा महिला सक्षमीकरण आणि सामाजिक व्यवस्थेवर संवेदनशीलपणे प्रकाश टाकते. चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे नवख्या कलाकारांचा दमदार अभिनय आणि किरण रावचे उत्तम दिग्दर्शन होय.

लापता लेडीज या चित्रपटाने ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह १३ पुरस्कार जिंकले. ९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) भारताची अधिकृत एंट्री म्हणून या चित्रपटाची निवड झाली होती. तसेच आयफा पुरस्कारांमध्ये लापता लेडीजने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह १० पुरस्कार जिंकले.