Level Cross Malayalam Movie Review: मल्याळम चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा एका जबरदस्त सायकोलॉजिकल थ्रिलरसह आपली छाप पाडली आहे. २०२४ मध्ये एक असा मल्याळम सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आला होता, ज्याने प्रेक्षकांना थक्क केलं. सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात प्रत्येक क्षणी एक नवीन ट्विस्ट येतो. दोन पात्रांभोवती फिरणारी ही कथा आणि त्यांच्यात घडणाऱ्या घटना या चित्रपटाला अधिक रंजक बनवतात.

या चित्रपटाचे नाव ‘लेव्हल क्रॉस’ (Level Cross) आहे. हा एक मल्याळम सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून यात आसिफ अली आणि अमाला पॉल मुख्य भूमिकेत आहेत. जर तुम्हाला या विकेंडला काहीतरी वेगळं आणि डोकं चक्रावून टाकणारं पाहायचं असेल, तर ‘लेव्हल क्रॉस’ हा एक उत्तम पर्याय आहे. सस्पेन्स, सायकोलॉजी आणि सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

सस्पेन्स प्रेमींसाठी पर्वणी

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लेव्हल क्रॉस’ हा चित्रपट म्हणजे सस्पेन्स आणि उत्कंठेचा एक उत्तम संगम आहे. दिग्दर्शक अरफाझ अयुब यांनी एका निर्जन रेल्वे क्रॉसिंगच्या पार्श्वभूमीवर मानवी मन, भीती आणि रहस्याचे जे जाळे विणले आहे, ते प्रेक्षकांना शेवटपर्यंत जागेवरून उठू देत नाही. आसिफ अली आणि अमाला पॉल यांनी साकारलेली पात्रे आणि त्यांच्यातील संघर्ष इतका प्रभावी आहे की, पडद्यावर जे दिसतंय ते खरं की भास, हे ओळखणे कठीण होते. प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेला हा चित्रपट सस्पेन्स प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.

लेव्हल क्रॉसची कथा

या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे, यात जे दिसतं ते पूर्णपणं खरं नसतं. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. यातलं नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय ते कळतच नाही. कथेची सुरुवात एका निर्जन रेल्वे क्रॉसिंगपासून होते, जिथे एक चौकीदार (आसिफ अली) एकटाच राहत असतो. तो दिसायला खूप विचित्र आहे आणि त्याचे राहणीमानही इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तो अनेकदा तिथून जाणाऱ्या ट्रेनकडे पाहत राहतो आणि पुन्हा आपल्या घरी परततो. त्याचे आयुष्य अत्यंत रहस्यमयी आहे.

एक महिला (अमला पॉल) चालत्या ट्रेनमधून उडी मारते आणि तो चौकीदार तिला जखमी अवस्थेत आपल्या घरी घेऊन येतो. शुद्धीवर आल्यावर ती महिला स्वतःबद्दल काही गोष्टी सांगते, पण तिच्या वागण्यावरून असं स्पष्ट जाणवतं की ती काहीतरी लपवत आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, ती त्या चौकीदारालाही घाबरताना दिसते. इथूनच कथेतील सस्पेन्स अधिक वाढत जातो.

नवनवीन ट्विस्ट

चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात जे काही दाखवलं जातं, ते पूर्णपणे खरं नसतं. कथा प्रेक्षकांना वारंवार संभ्रमात टाकते आणि प्रत्येक वळणावर एक नवीन ट्विस्ट घेऊन येते. याच कारणामुळे शेवटपर्यंत प्रेक्षक जे बघतोय त्यातलं काय खरं आहे, याचा अंदाज लावू शकत नाहीत.

दिग्दर्शक अरफाझ अयुब यांनी मानवी मन, भीती आणि मानसिक स्थिती या गोष्टी चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांनी दोन्ही पात्रांमधील केमिस्ट्री आणि त्यांच्यातील संघर्ष खूप चांगल्या प्रकारे दाखवला आहे. विशेष म्हणजे, मोजकी पात्रे आणि मर्यादित लोकेशन असूनही चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. चित्रपटाची सुरुवात थोडी संथ वाटत असली, तरी जसजशी कथा पुढे सरकते, तसतशी पकड घट्ट होत जाते. मध्यंतरानंतर चित्रपटाचा वेग वाढतो आणि क्लायमॅक्स तर इतका शॉकिंग आहे की तुम्हाला विश्वासच बसणार नाही.