Love Insurance Company LIK OTT Release : हल्ली कुठलाही सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला की तो ओटीटीवर कधी येणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. अशातच आता पडद्यावर अनेकांचं मनोरंजन केल्यानंतर आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘लव्ह इन्शुरन्स कंपनी’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
‘लव्ह इन्शुरन्स कंपनी’ हा सिनेमा ओटीटीवर येणार असून साऊथ स्टार प्रदीप रंगनाथनच्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने आपल्या कथेमुळे सगळ्यांची मनं जिंकली आहेत. आता निर्मात्यांनी प्रदीपच्या ‘लिक’ या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच हा साऊथचा नवीन चित्रपट ओटीटीवर दिसणार आहे. चला तर मग, हा चित्रपट ऑनलाइन कधी आणि कुठे पाहता येणार आहे ते जाणून घेऊया…
ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येईल ‘लिक’?
प्रदीप रंगनाथन यांच्या ‘लिक’ या नवीन चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट येत्या ६ मेपासून ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी हा चित्रपट अजून थिएटरमध्ये पाहिला नाही, ते काही दिवसांत घरबसल्या सहज ऑनलाइन हा सिनेमा पाहू शकतात.
हा चित्रपट भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम केला जाणार आहे. हा सिनेमा मूळ तमिळ भाषेत असून, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्येही डब करून उपलब्ध असेल. ‘ड्रॅगन’ आणि ‘ड्यूड’ सारख्या दमदार चित्रपटांमधून चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या प्रदीप रंगनाथन यांचा ‘लव्ह इन्शुरन्स कंपनी’ हा चित्रपटही तितकाच भन्नाट आहे.
चित्रपटाची कथा काय आहे?
या चित्रपटाची गोष्ट खूपच रंजक असून भविष्यात प्रेमाची व्याख्या कशी असेल त्याचं कल्पनात्मक चित्र यामधून दाखवण्यात आलं आहे. २०४० सालच्या चेन्नईतील गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळते. इथे प्रेम नशिबावर सोडलं जात नाही, तर एक कंपनी ते इन्शुर करून त्याची हमी देते. सूरियन हा त्या कंपनीचा महत्त्वाकांक्षी सीईओ आहे. त्याचा असा विश्वास आहे की नातेसंबंधांना अल्गोरिदमच्या मदतीने समजून घेता आणि नियंत्रित करता येऊ शकतं.
वाइब वासे हा मोकळ्या विचारांचा मुलगा आहे. त्याला वाटतं की प्रेम नैसर्गिक आणि अनपेक्षितच असावं. पण त्याचं आयुष्य बदलतं, जेव्हा त्याची भेट धीमाशी होते. धीमा मात्र LIK सिस्टिमवर पूर्ण विश्वास ठेवते.
या दोघांची सुरू झालेली प्रेमकथा दोन वेगवेगळ्या विचारांना आमने-सामने आणते. मानवी भावना आणि कॉर्पोरेट कंट्रोल यांच्यातील हा संघर्ष शेवटी एक मोठा प्रश्न उभा करतो. ज्या जगात भावनासुद्धा वस्तू बनल्या आहेत, तिथे खरं प्रेम टिकू शकतं का? असं काहीसं चित्र या सिनेमात दिसतं.
