Lock Upp 2 Akanksha Chamola Asexual Confession: ‘लॉक अप २’ मधील स्पर्धक आकांक्षा चमोला सातत्याने चर्चेत असते. आधी तिने शोमध्ये घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर सांगितलं की गौरव खन्नाशी लग्न करण्यापूर्वी ती बायसेक्शुअल होती. आता तिने ए-सेक्शुअल म्हणजेच अलैंगिक असल्याचा खुलासा केला आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेने इंटिमसीबद्दलचे तिचे विचार बदलले आहेत आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांनंतर लैंगिकताही बदलू शकते, असं तिने म्हटलंय.

‘लॉक अप’च्या या भागात आकांक्षा जेलमधील स्पर्धक वरुण यादवबरोबर नात्यांबद्दल बोलताना दिसली. आकांक्षाला पुन्हा लग्न करण्याचा विचार करणार का? असं विचारण्यात आलं. त्यावर तिने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, “माझ्या मनात आता भीती बसली आहे.” त्यानंतर वरुणने तिला तिच्या लैंगिकतेबद्दल विचारलं, त्यावर आकांक्षाने सांगितलं की, माणसाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार ही गोष्ट बदलू शकते, असा तिचा विश्वास आहे.

आकांक्षा चमोला म्हणाली, “लैंगिकता बदलत राहते. हे तुमच्या आयुष्यातील टप्प्यांवर अवलंबून असते. सध्या माझा घटस्फोट होत आहे आणि मला आता कोणासोबतही शारीरिक संबंध नको आहेत. ना मुलींबरोबर, ना पुरुषांबरोबर. माझा सध्या एक वेगळाच टप्पा सुरू आहे. याला ‘ए-सेक्शुअल’ म्हणतात.”

गौरव खन्ना आकांक्षापासून घटस्फोट का घेतेय?

यापूर्वी अनेकदा शोमध्ये आकांक्षाने गौरव खन्नापासून वेगळे होण्याच्या कारणांबद्दलही सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, तिला कधीही आई व्हायचे नव्हतं. बऱ्याच लोकांना लग्न करून मुलं जन्माला घालायची असतात, पण तिला मुलं नको आहेत. त्याउलट गौरव खन्नाला मात्र मुलं हवी होती, पण आकांक्षा तयार नसल्याने तो तिला साथ देत होता. आकांक्षाच्या मते तिच्या व गौरवच्या या लग्नापासूनच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांनी हे नातं संपवायचा निर्णय घेतला आहे.

आकांक्षाने स्वतःला म्हटलं होतं ‘बायसेक्शुअल’

आकांक्षाने यापूर्वी आपण बायसेक्शुअल असल्याचंही सांगितलं होतं. तिला नेहमीच महिलांबद्दल आकर्षण होतं, महिलांसोबत राहण्यात तिला सुरक्षित व शांत वाटतं. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या जगात मोठी होत असताना आलेल्या अनुभवांमुळेच तिला महिलांसोबत अधिक सुरक्षित वाटू लागलं. आकांक्षाच्या मते तिला महिलांबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं. इतकंच नाही तर ती बायसेक्शुअल असल्याचं गौरव खन्नाला माहीत होतं आणि त्याने तिला स्वीकारलं, असंही तिने म्हटलं होतं.

ए-सेक्शुअल किंवा अलैंगिक म्हणजे काय?

ए-सेक्शुअल किंवा अलैंगिक म्हणजे अशा व्यक्ती, ज्यांना इतर कोणत्याही व्यक्तीबद्दल (स्त्री किंवा पुरुष) कोणतेही शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण वाटत नाही.