अभिनेता रितेश देशमुख व दिग्दर्शिका फराह खान होस्ट करत असलेला ‘लॉक अप सीझन २’ हा शो दररोज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अनेक सेलिब्रिटी यामध्ये त्यांच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर, वाईट प्रसंग सांगितले ज्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल बरीच चर्चा झाली. अशातच आता पुन्हा एकदा या शोने लक्ष वेधलं आहे परंतु, यावेळी कुठल्या स्पर्धकाने नाही तर स्वत: सूत्रसंचालक रितेश देशमुखने.
‘बिग बॉस मराठी’नंतर रितेश या शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्याच्या सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीचं कौतुकही होत आहे. अशातच आता अभिनेत्याने कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना अभिनेते व राजकीय नेते रवी किशन यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. एका शोमध्ये रवी किशन यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ घेत रितेशने त्यांना टोला लगावल्याची चर्चा सुरू आहे. रवी किशन नेमकं काय म्हणाले होते आणि रितेशने खरंच त्यांंना टोमणा मारलाय का याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
‘लॉक अप’मध्ये नेमकं काय घडलं?
नेटफ्लिक्सवरील शो ‘लॉक अप २’ दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. शोमध्ये अपूर्वा मखीजा हिने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतल्यानंतर अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाले. मात्र, आता तिच्याबाबतच एक मोठा खुलासा रितेशने केला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात रितेश देशमुखने अपूर्वाची खरी ओळख सर्व स्पर्धकांसमोर उघड केली. हा खुलासा ऐकून घरातील सर्वच स्पर्धकांना मोठा धक्का बसला. याचदरम्यान रितेश देशमुखने एक असं वक्तव्य केलं, ज्याचा संबंध अनेक प्रेक्षक रवी किशन यांच्याशी लावत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला?
नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात रितेश देशमुखने मोठा खुलासा करत सांगितलं की, अपूर्वा मखीजा ही शोमध्ये स्पर्धक म्हणून नव्हे, तर ‘इन्फॉर्मर’ (गुप्त माहिती देणारी व्यक्ती) म्हणून आली होती. अपूर्वाचं कौतुक करत रितेश म्हणाला, “सर्वप्रथम अपूर्वा, खूप छान काम केलंस. तू तुझी भूमिका उत्तम प्रकारे पार पाडलीस. तुला देशाची ड्युटी करायची नाहीये, पण देशमुखने दिलेली ड्युटी आता संपली आहे.” रितेश देशमुखच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांना त्याचा “देशाची ड्युटी” हा उल्लेख अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर असल्याचं वाटत आहे.
रवी किशन काय म्हणाले होते?
अनेक प्रेक्षकांनी रितेश देशमुखच्या वक्तव्याचा संबंध रवी किशन यांच्याशी जोडण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी रवी किशन अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील रिअॅलिटी शो ‘द अलायन्स’मध्ये लेक रीवा किशनबरोबर सहभागी झाले होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांना हा शो अर्धवट सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, “सिस्टमकडून मला मॅसेज आला आहे की, मला तातडीने देशाच्या सेवेसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे मला या क्षणी निरोप घ्यावा लागेल.” याच संवादामुळे आता ‘लॉक अप २’मध्ये रितेश देशमुखने “देशाची ड्युटी” असा उल्लेख केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तो रवी किशन यांच्या त्या संवादाशी जोडला आहे. सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, ‘लॉक अप सीझन २’ हा शो आता रंजक वळणावर आला असून येत्या काही दिवसात हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेईल. शो जिंकणाऱ्या विजेत्याला कोट्यवधींच बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे या शोच्या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं आहे. हे येत्या काळातच कळेल.
