Lock Upp 2 Eviction: नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप २’ या रिअॅलिटी शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यामधील स्पर्धक, त्यांच्यातील वाद आणि गुपितं यांमुळे प्रेक्षकांमध्ये या शोबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, तरुणाईकडून या शोला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार व इन्फ्लुएन्सर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुपितं आणि घडलेल्या घडामोडी सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय टीव्ही कलाकार राम कपूर याने त्याच्यावर लहानपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता आणखी एका स्पर्धकाने त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये चुकीचे वर्तन झाल्याची कबुली दिली आहे.

‘लॉक अप : सच या सजा’मध्ये नुकतेच इव्हिक्शन झाले असून, यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुफी मोतीवाला हा शोमधून बाहेर पडला आहे. शोमध्ये अनेकदा सुफीने त्याच्याबरोबर घडलेले वाईट प्रसंग आणि काही आठवणी यांची चर्चा केली होती. त्यानंतर आता शोमधून बाहेर पडताना सुफी मोतीवाला याने त्याचे सीक्रेट सांगितले आहे. कॉलेजमध्ये असताना त्याचा रूममेट व हॉस्टेलच्या मालकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची कटू आठवण सुफी मोतीवाला याने सांगितली आहे.

आयुष्यात प्रेमाची कमतरता – सुफी

सुफीने ‘लॉक अप’ शोमधून बाहेर पडताना त्याच्या तीन वैयक्तिक गोष्टींची माहिती दिली. त्याच्या आयुष्यात कायम प्रेम, स्थैर्य आणि सुरक्षिततेची कमी राहिल्याची खंत सुफीने व्यक्त केली. भावूक होत तो म्हणाला, “माझं पहिलं सत्य म्हणजे आयुष्यभर मला प्रेमाची आणि मायेची गरज होती आणि ते मिळावं, अशी माझी अपेक्षा होती. दोन वेळा मला असे पुरुष मित्र मिळाले, ज्यांच्याबरोबर माझी खूप चांगली मैत्री झाली; पण मी त्यांच्या प्रेमात पडलो आणि तेही माझ्या आयुष्यातून निघून गेले. त्यामुळे आजही मला आयुष्यात प्रेमाची कमतरता जाणवते.”

त्यानंतर सुफीने आयुष्यातील सर्वांत मोठ्या पश्चात्तापाबद्दलची माहिती दिली. तो म्हणाला, “माझं दुसरं सत्य म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या पश्चात्तापाची घटना ही आहे की, मी दिल्लीमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या आजीचं निधन झालं. त्याच्या दोन दिवस आधी तिनं मला फोन केला होता; पण मी तो उचलला नाही. त्यानंतर तिचं निधन झाल्यावर माझ्या कुटुंबीयांनी मला तिच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ दिलं नाही; मात्र तिनं माझ्यासाठी ५० हजार रुपये ठेवले होते. त्या पैशांतून मी नवीन फोन विकत घेतला आणि कंटेंट क्रिएशन सुरू केलं. आज मी इथे आहे, याचं कारण तीच आहे,”

सुफी मोतीवालाबरोबर झाला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

तिसरे गुपित सांगताना सुफीने कॉलेजच्या दिवसांतील धक्कादायक अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी कॉलेजमध्ये असताना माझा रूममेट माझ्या बेडसमोर बसून माझ्याकडे एकटक पाहत असायचा. एके दिवशी त्यानं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानं मला किस केलं; पण मी त्याला धक्का दिला आणि दूर ढकललं. त्यानंतर मी पीजी मालकाकडे जाऊन त्याची तक्रार केली. मात्र, तक्रार केल्यानंतर तो मला बोलला, ‘त्याच्याबरोबर झोपण्यापेक्षा माझ्याबरोबर का झोपत नाहीस?’ त्यामुळे त्या दिवशी मला स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घ्यावं लागलं. मी तब्बल १२ तास तिथेच बंद होतो आणि त्या घटनेनं मला प्रचंड मानसिक धक्का बसला. हा ट्रॉमा मी अजूनही विसरलेलो नाही.”