Lust Stories 3 : Lust या इंग्रजी शब्दाचा अर्थ कामवासना, शरीर संबंधांबाबतची भूक असा होतो. या एका संकल्पनेवर आधारीत ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाचा आता तिसरा भाग आला आहे. शिवाय आधीच्या दोन भागांपेक्षा वेगळा म्हणता येईल असाही हा चित्रपट ठरतो आहे. चार दिग्दर्शक आणि त्यांनी दाखवलेल्या चार कथा असं या सिनेमाचं सूत्र आहे. विक्रमादित्य मोटवानी, किरण राव, शकुन बत्रा आणि विशाल भारतद्वाज या चार दिग्दर्शकांनी लस्ट स्टोरीज ३ च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. जाणून घेऊ कसा आहे हा चित्रपट.

चित्रपटाचं वेगळेपण काय?

कोंकणा सेन शर्मा, विजय वर्मा, राधिका आपटे, अभिषेक बॅनर्जी, गुरफतेह पीरजादा, सना थंपी, राधिका मदान, अली फजल, आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अशी चांगली स्टारकास्टही या चित्रपटात आहे. चार दिग्दर्शक आहेत त्यांच्या चार कथा आहेत. या चारही कथांमधला कामवासनेचा एक धागा हा अगदी कॉमन आहे पण त्या पलिकडे जाऊन चारही दिग्दर्शकांनी विचार केला आहे तो भावनिक गुंतागुंतीचा. ज्यामुळे या कथा वेगळ्या झाल्या आहेत.

विक्रमादित्य मोटवानींची कथा काय?

राधिका आपटे, कोंकणा सेन शर्मा, विजय वर्मा आणि अभिषेक बॅनर्जी या चौघांभोवती ही कथा फिरते, चाळिशी उलटलेल्या दोन महिला आहेत. ज्यांची चांगली मैत्री आहे. त्यांच्यात एक गोष्ट ठरते आणि मग ती ठरल्याप्रमाणे घडते का? यावर या कथेत भाष्य केलं गेलं आहे. महिलांच्या इच्छा, त्यांच्या मनातल्या भावना या एकतर गृहीत धरल्या जातात किंवा डावलल्या जातात हे ही कहाणी सांगते. या कथेचा आलेख उंचावत नेला आहे. पण क्लायमॅक्सला थोडासा गोंधळ उडाल्याचं जाणवतं. अर्थात ही कथाही छान जमून आली आहे. राधिका आपटे, कोंकणा, विजय वर्मा आणि अभिषेक बॅनर्जी सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे.

किरण रावचं उत्तम दिग्दर्शन आणि हळूहळू उलगडणारे मानवी स्वभावाचे पदर

गुरफतेह पीरजादा आणि सना थंपी यांच्यावर आधारीत दुसरी कथा आहे जी मुंबईत घडते. पैसे मिळवण्याची हाव, समोरच्याचा वापर करून घेण्याची वृत्ती, शारिरीक आणि भावनिकही. यावर कथा भाष्य करते. किरण रावने या कथेचं दिग्दर्शन केलं आहे. या कथेच्या शेवटी दिलेला ट्विस्ट आपल्यालाही चकित करतो. जी गोष्ट आपल्याला वाटत असते अगदी त्याच्या विरूद्ध बाजू समोर येते. धक्कातंत्राचा चांगला वापर किरण रावने या गोष्टीत केला आहे. किरण रावचं उत्तम दिग्दर्शन या कथेला लाभलं आहे. मानवी स्वभावाचे पदर उलगडून दाखवण्यात ती यशस्वी झाली आहे.

शकुन बत्राची गोष्ट सर्वाधिक उठावदार

लस्ट स्टोरीज ३ मधली सगळ्यात उत्तम कथा किंवा उत्तम जमून आलेली ही फिल्म आहे. राधिका मदान आणि अली फजल या दोघांनी एका मराठी उच्चभ्रू जोडप्याचं पात्र स्वीकारलं आहे. दोघांचं लग्न थाटात झालंय. पण अवघ्या दीड दोन वर्षातच काडीमोड घेण्याची वेळ आली आहे. ती का? ते ही कथा सांगत जाते. शिवाय नात्यांमधली गुंतागुंत, घरातल्या लोकांच्या अपेक्षा, लग्न निभावण्याची जबाबदारी, समाजाचं ओझं वगैरे अनेक समजांवर, अपसमजांवर ही कथा भाष्य करते. या कथेचं वेगळेपण असं ठरतं की यात लांब किंवा पल्लेदार संवाद नाहीत. छोट्या छोट्या फ्रेम्समधून आणि डोळ्यांमधून पात्रं प्रेक्षकांशी बोलत राहतात. जिन्याच्या पायऱ्यांचा उत्तम प्रयोग या कथेत करण्यात आला आहे. लग्न संस्थेवरून हल्लीच्या पिढीचा विश्वासच उडत चालला आहे किंवा लग्न संस्था संपुष्टात येते की काय अशीच स्थिती दिसून येते आहे अशात ही कथा मनाला भावून जाते यात शंका नाही.

विशाल भारतद्वाजची कथाही वेगळी

विशाल भारतद्वाजने दिग्दर्शित केलेली कथा आपल्याला ८० च्या दशकात नेते. ही कथा आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ या दोघांभोवती फिरते. या कथेची भट्टीही चांगली जमून आली आहे. शिवाय यात व्हिज्युअल्सचा खूप चांगला वापर करण्यात आला आहे. कथा हैदराबादमध्ये घडते. शरीर संबंध, सेक्स याबाबत उघडपणे भाष्य केलं जात नव्हतं तेव्हाचा हा काळ आहे. काही पुस्तकं, त्यातले फोटोज यातून कसा संवाद साधला जायचा, त्यावेळची भावनिक गरज कशी होती यावर ही कथा भाष्य करते. विशाल भारतद्वाजची ही कथा एखाद्या नाजूक चित्रासारखी आहे. शिवाय या कथेत आदिती रावचं कॅरेक्टर हे खूप चांगल्या पद्धतीने फुलवत नेलं आहे. आदिती आणि सिद्धार्थ या दोघांनीही त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यामुळे पाहिला नसेल तर नक्की बघा लस्ट स्टोरीज ३.