Lust Stories 3 trailer release: ‘लस्ट स्टोरीज’ हा सिनेमा २०१८ ला प्रदर्शित झाला होता. सिनेमाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप, झोया अख्तर, करण जोहर यांनी केले होते. यामध्ये राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोईराला, विकी कौशल, नेहा धुपिया, कियारा अडवाणी, आकाश ठोसर असे अनेक कलाकार दिसले होते.

लस्ट स्टोरीज २ हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष, आर बल्की केले होते. तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोमे, विजया वर्मा, मृणाल ठाकूर, अमृता सुभाष, काजोल, नीना गुप्ता असे अनेक लोकप्रिय कलाकार दिसले होते.

आता लस्ट स्टोरीजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राधिका आपटे आणि कोंकणा सेन शर्मा या लस्ट स्टोरीज ३ मध्ये दिसणार आहेत. या दोन अभिनेत्रींबरोबरच अनेक कलाकार दिसणार आहेत. आदिती राव हैदरी, अली फजल, राधिका मदान, विजय वर्मा, सिद्धार्थ, अभिषेक बॅनर्जी, गुरफतेह पीरजादा आणि सना थम्पी हे कलाकार दिसणार आहेत. लस्ट स्टोरीज ३ चे दिग्दर्शन चौघांनी केले आहे. विक्रम आदित्य मोटवाने, किरण राव, शकुन बत्रा आणि विशाल भारद्वाज यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

लस्ट स्टोरीज ३ च्या ट्रेलरमध्ये प्रत्येकाची वेगळी गोष्ट पाहायला मिळते. प्रत्येकाचे वेगळे प्रश्न, इच्छा आणि आयुष्याकडून, जोडीदाराकडून अपेक्षा असल्याचे दिसते. यामुळे नात्यात गोंधळही झाल्याचे पाहायला मिळते. काहीवेळा या सगळ्यामुळे गमतीजमती घडतानाही दिसतात. मात्र, नेमके कोणाच्या आयुष्यात काय घडते आणि ही पात्रे एकमेकांशी जोडली जातात, हे सिनेमात पाहायला मिळणार आहे.

हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १८ सप्टेंबर २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. आता लस्ट स्टोरीज आणि लस्ट स्टोरीज २ इतकाच हा तिसरा भागही प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.