Watch These Series & Film Of Madhuri Dixit On OTT : माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ९० च्या काळात तिने अनेक हिट चित्रपट देत लोकप्रिय नायकांसह काम केलं. माधुरीने तिच्या सहज सुदंर अभिनयाने, सौंदर्याने आणि नृत्यशैलीने प्रेक्षकांना भुरळ घातली. आजही तिची क्रेझ कायम आहे. मोठा पडदा गाजवल्यानंतर आता ओटीटीच्या जगात माधुरी इथेही तिच्या कामातून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
सध्या माधुरी तिच्या ‘मां बहन’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. यापूर्वी तिची ‘मिसेस देशपांडे’ ही सीरिज प्रदर्शित झालेली, ज्याची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. ओटीटीवरील या कलाकृतींमधून माधुरी वेगवेगळ्या भूमिकेतून पाहायला मिळाली. माधुरीने ओटीटीवरील तिच्या या कलाकृतीतून तिची नृत्यांगणा अशी असलेली ओळख पुसत संघर्ष करणारी आई, अत्याचार सहन करणारी पत्नी अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर तिच्या अभिनयाची छाप सोडली. मोठ्या पडद्यानंतर माधुरीने ओटीटीवर कोणत्या चित्रपटात व सीरिजमध्ये काम केलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
ओटीटीवर पाहा माधुरी दीक्षितच्या ‘या’ सीरिज व चित्रपट
माधुरीने ‘द फेम गेम’ या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं. माधुरीची ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली. यामध्ये तिने अनामिका आनंद हे पात्र साकारलेलं, जी एक सुपरस्टार असते पण ती अचानक गायब होते; त्यानंतर सीरिजमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. ‘द फेम गेम’ ही सीरिज फक्त हिट ठरली नाही तर तिने नेटफ्लिक्सवरील ग्लोबल १० मध्येही स्थान मिळवलं. १६ देशांमध्ये ही सीरिज ट्रेंडिंग होती.
‘मजा मा’ ही माधुरी दीक्षितची ओटीटीवरील दुसरी कलाकृती आणि पहिला चित्रपट आहे, जो अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला. हा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचा पहिला भारतीय चित्रपट आहे. यामध्ये माधुरीने पल्लवी पटेल ही भूमिका साकारली आहे, जी एक मध्यमवयाची गृहिणी असते. पण, जेव्हा तिच्या खासगी आयुष्यातील एक गोष्ट समोर येते, तेव्हा तिच्या आयुष्यात मोठं वळण येतं.
‘मिसेस देशपांडे’ – अलीकडेच माधुरीची ही सीरिज प्रदर्शित झाली. यामध्ये माधुरीने सीमा देशपांडे ही भूमिका साकारली आहे, जी एक सीरियल किलर असते, त्यामुळे झालेल्या शिक्षेनुसार उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवत असते. पण, भूतकाळातील एका व्यक्तीमुळे ती बाहेर येते आणि पुढे पुन्हा तिच्या आयुष्यात महत्त्वाचं वळण येतं. ही सीरिज एका फ्रेंच सीरिजचा हिंदी रिमेक आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळतो. त्याने माधुरीच्या मुलाची तेजस फडकेची भूमिका साकारली आहे. ही सीरिज जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली.
‘द फेम गेम’, ‘मजा मा’, ‘मिसेस देशपांडे’ या सीरिज आणि चित्रपटांनंतर माधुरी आता लवकरच ‘मां बहन’ या सीरिजमधून पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून झळकणार आहे. तिची ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासह तृप्ती डिमरी, रवी किशन हे कलाकार झळकणार आहेत. अद्याप या सीरिजची रीलिज डेट जाहीर झालेली नाही.

