Made In Korea OTT Release : कोरियन सिनेमे, सीरिज यांची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असते. हल्लीच्या नवीन पिढीला विशेषकरून कोरियन कलाकार आणि त्यांच्या कलाकृती प्रचंड आवडतात. कोरियन प्रेमकहाण्यांना विशेषकरून अधिक प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक रील्स व्हायरल होत असतात.

ओटीटीमुळे घरबसल्या विविध भाषेतील, देशातील कथा-कलाकृतींचा आनंद घेता येतो, त्यामुळे दर आठवड्याला प्रेक्षक आता ओटीटीवर काय नवीन पाहायला मिळणार या उत्सुकतेत आणि नवीन कलाकृतीच्या शोधात असतात, म्हणूनच आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो लवकरच ओटीटीवर रिलीज होणार असून विशेष म्हणजे याचा साउथ कोरियाशी खास संबंध आहे.

‘हा’ तमिळ चित्रपट साउथ कोरियामध्ये झालाय चित्रित

दाक्षिणात्य इंडस्ट्रीत विविध जॉनरचे चित्रपट बनत असतात. परंतु, रोमँटिक आणि थ्रिलर धाटणीच्या दाक्षिणात्य चित्रपटांना अधिक प्रतिसाद मिळत असतो, म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा एका रोमँटिक दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो साउथ कोरियाध्ये चित्रित झाला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘मेड इन कोरिया.’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियांका मोहन मुख्य भूमिकेत आहे. या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोरियामध्ये चित्रीत झाला असल्याने त्याच्याबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘मेड इन कोरिया’ या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर रा कार्तिक (Ra Karthik) दिग्दर्शित या चित्रपटाची कथा शेनबागम (Shenbagam) नावाच्या तरुण महिलेभोवती फिरते, जी एका छोट्या गावातून आलेली असते. पण, तिची स्वप्नं खूप मोठी असतात. तिचं साउथ कोरियाला जाण्याचं स्वप्न असतं. कोणाचाही पाठिंबा न मिळाल्याने ती कोरियाला जायचं ठरवते. पण, त्याचवेळी तिच्या आयुष्यात मोठं आव्हान येतं, जेव्हा तिचा जोडीदार तिचा विश्वासघात करतो आणि परदेशात तिला एकटीला सोडून जातो. विश्वासघात, भावनिक खच्चीकरण, एकटेपण, भाषेची अडचण आणि अनोळखी ठिकाण व संस्कृती; अशा परिस्थितीत ती एकटीने सगळं कसं निभावून नेणार हे यामधून पाहायला मिळणार आहे.

‘मेड इन कोरिया’ हा तामिळ रोमँटिक चित्रपट या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. १२ मार्चपासून हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल. हा चित्रपट तामिळ,कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट संस्कृती, स्वत:ची ओळख अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकतो. आधी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता चित्रपटगृहात प्रदर्शित न होता तो थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे.