ओटीटीवर नेहमीच वेगवेगळे कथानक असलेले चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत असतात तर कधी काही जुने चित्रपटही ट्रेंड होत असतात. अशातच आता ७ वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे धक धक गर्ल माधुरी दीक्षित या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. हा चित्रपट कोणता आहे आणि कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊयात…
माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘मां बहन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने खूपच वेगळी भूमिका साकारली आहे. शिवाय यातील तिच्या लूकचंही अनेक जण कौतुक करत आहेत. अशातच आता सध्या अभिनेत्रीचा एका जुना चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूडमधील तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झालेला. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली होती. यातील माधुरीच्या अभिनयाने आणि नृत्याने अनेकांची पसंती मिळवली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर संजय दत्तसुद्धा झळकलेला.
माधुरीचा ‘हा’ चित्रपट होतोय ट्रेंड
७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग असलेल्या या चित्रपटाचं नाव आहे ‘कलंक’. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त यांच्यासह वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. यामधून तीन प्रेमकहाणी पाहायला मिळाली. कलाकारांची इतकी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण, टीव्ही आणि ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र याला अनेकांची पसंती मिळाली. सध्या करण जोहरची निर्मिती असलेला ‘कलंक’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
अभिषेक वर्मन यांनी ‘कलंक’ चित्रपटाच्या लिखानाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. चित्रपटात भारताच्या फाळणीचा काळ दाखवण्यात आला आहे. ज्यात एका मोठ्या घरातील सुनेचं एका दुसऱ्या धर्मातील पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचं पाहायला मिळतं. त्यांची प्रेमकहाणी फाळणीमुळे अपूर्ण राहते. शिवाय चित्रपटात एकापेक्षा एक अशी सुंदर गाणीसुद्धा आहेत.
दरम्यान, या चित्रपटातील कलाकारांचे लूक, त्यांची पात्र, सेट, गाणी, नृत्य आणि संवाद सगळंच हिट ठरलं होतं. आजही यातील गाणी अनेक जण ऐकत असतात. चित्रपटातील भव्य सेटने अनेकांचं लक्ष वेधलं. आलिया आणि माधुरीने यामध्ये एकत्र ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर नृत्य केलं होतं जे आजही तितकंच हिट आहे.
