Madhuri Dixit’s Mrs Deshpande Cast : माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. पण, ओटीटीवर अभिनेत्री निवडक कलाकृतींमधूनच दिसली. पण, काही दिवसांपासून ती तिच्या ‘मिसेस देशपांडे’ या नवीन सीरिजमुळे चर्चेत आहे आणि तिची ही सीरिज ओटीटीवरील सर्वाधिक पाहिली जात असलेल्या सीरिजपैकीही एक ठरली आहे.

‘मिसेस देशपांडे’मधून माधुरी पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. तर तिच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकरही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पण, यासह यामध्ये इतरही काही मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘मिसेस देशपांडे’ ही सीरिज १९ डिसेंबरला ओटीटीवर रीलीज झाली.

‘मिसेस देशपांडे’मध्ये ‘या’ मराठमोळ्या कलाकारांची वर्णी

‘ला मांटे’ या सीरिजवर आधारित असलेल्या ‘मिसेस देशपांडे’मध्ये माधुरी दीक्षितने मिसेस सीमा देशपांडे ही भूमिका साकारली आहे. त्यामध्ये ती एका सीरियल किलरच्या भूमिकेत आहे आणि त्यामधून तिचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. माधुरीसह यामध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही तेजस फडके या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतो. तर, या थ्रिलर सीरिजमध्ये माधुरी दीक्षितच्या बालपणीची भूमिका बालकलाकार खूशी हजारे हिने साकारली आहे.

Award Banner

जिओ हॉटस्टारवरील ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमध्ये ‘थोडं तुझं थोडं माझं’फेम अभिनेत्री अंजली जोगळेकर पाहायला मिळते. त्यामध्ये तिनं एका वॉर्डनची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करीत अभिनेत्रीनं याबद्दलची माहिती दिली आहे. तिनं यावेळी दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांचे आभार मानले आहेत. माधुरी दीक्षितबरोबरही अंजलीचे काही सीन आहेत. त्यांच्यासह या सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकरही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यामध्ये त्यांनी दीनानाथ फडके ही माधुरी दीक्षितच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर ‘मिसेस देशपांडे’मध्ये अभिनेते जयवंत वाडकर, शिवराज वाळवेकर, गौरी किरण, हे कलाकारही पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीतच ‘मिसेस देशपांडे’मध्ये मराठमोळ्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्याचं पाहायला मिळतं.

सिद्धार्थ चांदेकर, प्रदीप वेलणकर, जयवंत वाडकर, अंजली जोगळेकर, खूशी हजारे, गौरी किरण, शिवराज वाळवेकर या मराठमोळ्या कलाकारांनी या सीरिजमध्ये त्यांच्या भूमिका चोख वठवल्या आहेत. त्याशिवाय माधुरी दीक्षितनंही यामध्ये तिच्या दमदार अभिनयानं अनेकांचं लक्ष वेधलं. माधुरीच्या या सीरिजला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.