Madhuri Dixit Mrs Deshpande Series : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने ‘मीट अँड ग्रीट माधुरी’ या शोचा अमेरिका दौरा पार पडल्यावर आपल्या चाहत्यांसाठी खास घोषणा केली आहे. ‘धकधक गर्ल’ लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी तिच्या आगामी सीरिजमध्ये सीरियल किलरच्या भूमिकेत झळकताना दिसेल. या सीरिजचं नाव आहे ‘मिसेस देशपांडे’. ही सीरिज प्रेक्षकांना कुठे पाहायला मिळणार? यामध्ये कोण-कोण झळकणार जाणून घेऊयात…

माधुरी नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मिसेस देशपांडे’ सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. दोन दिवसांपूर्वीच याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. आता अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत या सीरिजची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.

‘मिसेस देशपांडे’ ही सीरिज प्रेक्षकांना ‘जिओहॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. पुढच्या महिन्यात १९ डिसेंबरला ही सीरिज प्रदर्शित केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘मिसेस देशपांडे’ हा सीरिजची गोष्ट एका फ्रेंच मालिकेपासून प्रेरित आहे.

‘मिसेस देशपांडे’च्या टीझरमध्ये माधुरी डायनिंग टेबलजवळ बसून काकडी, गाजर कापत असते. इतक्यात रेडिओवरून बातम्या प्रसारित होतात. “८ खून झालेत तरीही यामागचा सूत्रधार नेमका कोण आहे हे अद्याप समजलेलं नाही” ही बातमी ऐकताच माधुरी काकडी कापता-कापता अचानक थांबते आणि काळजीपूर्वक हे वृत्त ऐकू लागते. यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक पुसट डेव्हिल स्माइल येते आणि पुन्हा ती कामाला सुरुवात करते. आता हे ८ खून करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा उलगडा १९ डिसेंबरला होईल.

दरम्यान, माधुरी दीक्षितसह या सीरिजमध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता सुद्धा झळकणार आहे. ‘My Next’ असं कॅप्शन देत या अभिनेत्याने तो ‘मिसेस देशपांडे’मध्ये झळकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचं नाव आहे सिद्धार्थ चांदेकर. मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आता धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह स्क्रीन शेअर करणार आहे.