Madhuri Dixit Triptii Dimri Dharna Durga Maa Behen Video: सोशल मीडियावर सध्या ‘मां बहन’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि लोकप्रिय इन्फ्लुएन्सर धरना दुर्गा एकत्र दिसणार आहेत. मात्र, नुकताच या तिघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये माधुरी आणि तृप्तीने धरना दुर्गाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला. यावरून दोन्ही अभिनेत्रींवर जोरदार टीका झाली. आता या संपूर्ण वादावर माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांनी मौन सोडले असून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी आणि तृप्ती डिमरी यांनी धरना दुर्गाबरोबरच्या या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण दिलं. सोशल मीडियावर अनेकदा साध्या आणि छोट्या गोष्टींचा विपर्यास करून त्याचं मोठ्या वादात रूपांतर केलं जातं, असं त्या म्हणाल्या.

तृप्तीने स्पष्ट केलं की, यामागे कोणाचाही वाईट हेतू नव्हता. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली की, अगदी साध्या आणि छोट्या, अर्थहीन गोष्टींनाही खूप मोठं भासवलं जातं आणि तिला याची सवय झाली आहे. ‘मां बहन’ चित्रपटाचे प्रमोशन करताना कोणताही वाद निर्माण होणार नाही, असं तिला वाटत होतं, पण वाद शेवटी झालाच.

तृप्ती डिमरीचं स्पष्टीकरण

तृप्ती म्हणाली, “आजकाल जेव्हा जेव्हा माझा एखादा चित्रपट रिलीज होणार असतो, तेव्हा मला आनंद व्यक्त करायलाही भीती वाटते. मी स्वतःला विचारत असते की, यावेळी लोक नेमकी कोणती गोष्ट पकडतील? आता काय नवीन वाद निर्माण करतील? मला वाटलं होतं की या चित्रपटात त्यांना वादासाठी काय सापडणार? यात असं काहीच नाहीये. यावेळेस ते काहीच बोलू शकणार नाहीत. पण तरीही त्यांनी काहीतरी शोधून काढलंच. काही लोक प्रत्येक वेळी असेच वागणार, आपण त्यात काहीच करू शकत नाही.”

माधुरी दीक्षित टीकेबद्दल म्हणाली…

माधुरीच्या मते, टीका करणे ही काही नवीन गोष्ट नाही, तर मुख्य फरक हा आहे की सोशल मीडियामुळे आता प्रत्येकाला आपली मतं आणि प्रतिक्रिया लगेच मांडण्यासाठी एक खुलं व्यासपीठ मिळालंय.

१९९० च्या दशकातील आणि आजच्या काळातील अशा वादांमधील फरक स्पष्ट करताना माधुरी म्हणाली, “असे ट्रोल करणारे लोक तेव्हाही होते, पण त्यांना आपली मते मांडण्यासाठी कोणतंही माध्यम नव्हतं. आज आपल्याकडे ते माध्यम आहे, त्यामुळे आजकाल प्रत्येक जण व्यक्त होत आहे. आज प्रत्येक जण स्वतःला चित्रपट निर्माता समजतो, प्रत्येक जण स्वतःला फॅशन एक्सपर्ट समजतो आणि प्रत्येक जण स्वतःला समाजाचा रक्षक समजतो.”

माधुरी दीक्षितचा आगामी चित्रपट

सध्या माधुरी तिच्या ‘मां बहन’ या आगामी कॉमेडी-थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि रवी किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केलंय. त्यांनी यापूर्वी ‘तुम्हारी सुलू’, ‘जलसा’ आणि ‘सुभेदार’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये माधुरी एका सिंगल मदरच्या भूमिकेत दिसत आहे, तर तृप्ती आणि धरना या तिच्या मुलींच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ४ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.