Main Vaapas Aaunga on Netflix : ओटीटीवर दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि सीरिज रिलीज होत असतात. यापैकी काही थेट ओटीटीवर येत असतात. तर काही चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ओटीटीवर येत असतात. या शुक्रवारीही असाच एक रोमँटिक चित्रपट ओटीटीवर आला. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा हा चित्रपट आता ओटीटीवरही धुमाकूळ घालतोय.
नेटफ्लिक्सवरील ट्रेंडिंग चित्रपटाच्या यादीत तीन दिवसांतच पहिल्या क्रमांकावर असेल्या या चित्रपटाचं नाव ‘मैं वापस आऊंगा’ आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ‘मैं वापस आऊंगा’ १२ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होताच या चित्रपटाने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
चित्रपटातील कलाकार
‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. खरं तर माऊथ पब्लिसिटीचा या चित्रपटाला मोठा फायदा झाला. यामध्ये दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ आणि नसिरुद्दीन शाह यांच्याबरोबर वेदांग रैनाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात संथ झाली होती आणि पुढेही कमाईचा संथ होता.
‘मैं वापस आऊंगा’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, ‘मैं वापस आऊंगा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटींचा व्यवसाय केला होता. पण हळुहळू चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि त्याने जगभरात ९९.३४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर भारतात ६५.१२ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे बजेट ७० कोटी रुपये होते. त्या तुलनेत चित्रपटाने चांगली कमाई केली. ‘मैं वापस आऊंगा’ यंदाच्या सर्वाधिक कमाई करणारा नववा बॉलीवूड चित्रपट ठरला.
२०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारे बॉलीवूड चित्रपट
१. धुरंधर २ – १८५०.८५ कोटी
२. बॉर्डर २ – ४८५.३ कोटी
३. भूत बंगला – २९२.६४ कोटी
४. धमाल ४ – २३१.१२ कोटी
५. वेलकम टू द जंगल – १९६.११ कोटी
६. कॉकटेल २ – १६६.१९ कोटी
७. ओ रोमियो – १२३.१ कोटी
८. अल्फा – ९९.०७ कोटी
९. मैं वापस आऊंगा – ९८.८५ कोटी
१०. है जवानी तो इश्क होना है – ८७.७८ कोटी
‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाच्या कथेचं, कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट तुम्ही थिएटर्समध्ये पाहिला नसेल तर आता तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहू शकता.
