काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर होतात, त्यानंतर त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. १२ जानेवारीला मेगास्टार चिरंजीवींचा एक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता हा चित्रपट एका महिन्याने ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव काय, कथा, बजेट, बॉक्स ऑफिस कलेक्शन याबद्दल जाणून घेऊयात.
‘मन शंकर वर प्रसाद गारू’ची कथा
हा एक अॅक्शन-कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात चिरंजीवी एका नॅशनल सिक्युरिटी ऑफिसरची (NIA) भूमिका साकारत आहेत, ज्याचे नाव शंकर वारा प्रसाद आहे. काही वैयक्तिक वाद आणि वैचारिक मतभेदांमुळे तो आपली पत्नी शशिरेखा (नयनतारा) आणि मुलांपासून ६ वर्षांपासून लांब असतो. जेव्हा त्याच्या कुटुंबावर काही शत्रूंमुळे संकट येते, तेव्हा तो आपली ओळख बदलून एका शाळेत पीटी शिक्षक म्हणून जातो, जेणेकरून तो आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल आणि पुन्हा त्यांचे प्रेम मिळवू शकेल.
‘मन शंकर वर प्रसाद गारू’चा ट्रेलर
‘मन शंकर वारा प्रसाद गारू’मधील कलाकार
या चित्रपटात चिरंजीवी, नयनतारा, व्यंकटेश डग्गुबती, कॅथरीन ट्रेसा, सचिन खेडेकर, झरिना वहाब हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल राविपुडी यांनी केले आहे. तर सिनेमाला भीम्स सीसिरोलिओ यांनी संगीत दिले आहे.
‘मन शंकर वारा प्रसाद गारू’चे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन
या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे २०० कोटी रुपये आहे. यात कलाकारांच्या मानधनाचा मोठा वाटा आहे. मात्र, दिग्दर्शकाच्या मते प्रत्यक्ष निर्मिती खर्च हा फक्त २८ ते ३० कोटींच्या आसपास होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरात २९५ कोटींची कमाई केली आहे. हा चिरंजीवी यांच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.
ओटीटी रिलीज
‘मन शंकर वारा प्रसाद गारू’ हा चित्रपट आज, ११ फेब्रुवारी २०२६ पासून ओटीटीवर रिलीज झाला आहे. तुम्ही तो ZEE5 वर पाहू शकता. हा चित्रपट मूळ तेलगू व्यतिरिक्त मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा एकूण सात भाषांमध्ये उपलब्ध आहे.
