Manoj Bajpayee Gajab Raat OTT Release: मनोज बाजपेयींचे पोलिसांच्या भूमिकांतील बरेच सिनेमे तुम्ही पाहिले असतील. मात्र, प्रत्येक भूमिका, प्रत्येक पात्र त्यांनी वेगळ्या पद्धतीने साकारले आहे आणि म्हणूनच त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. आता त्यांची प्रमुख भूमिका असलेला एक सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे, ‘गजब रात’ असे या सिनेमाचे नाव आहे.
क्राइम थ्रिलर सिनेमा ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर होतोय ट्रेंड
‘गजब रात’ हा सिनेमा २३ ऑक्टोबर २०२६ ला प्रदर्शित झाला आहे. मनोज बाजपेयी या सिनेमात पोलिस अधिकारी आहेत. पण, असा पोलिस अधिकारी जो कर्तव्यदक्ष नाही, ज्याच्याकडे फार सन्मानाने पाहिलं जात नाही, जो लाच घेऊन पैसे कमावतो आणि पुढचं आयुष्य सुखाने घालवायचे आहे त्याच्याकडे एक अशी केस येते, त्या केसमध्ये त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
गोष्ट एका रात्रीची आहे. संपूर्ण सिनेमा एक जखमी मुलगी, एक भ्रष्ट पोलिस अधिकारी अजय निर्वित, सीबीआय, एनआयएचे अधिकारी, राजकारणी या सगळ्यांभोवती फिरते. सिनेमाची गोष्ट, पात्रे आणि कलाकारांचा अभिनय अशी प्रत्येक गोष्ट लक्ष वेधून घेते. जवळजवळ दोन तासांचा हा सिनेमा प्रेक्षकांना एका ठिकाणी खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. क्राइम व थ्रिलर या जॉनरच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता तुम्हाला हा सिनेमा पाहायचा असेल तर तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ…
‘गजब रात’ हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये ‘गजब रात’ सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने नानीच्या ‘पॅराडाईज’ सिनेमाला मागे टाकले आहे.
या सिनेमात मनोज बाजपेयी यांच्याबरोबरच, नुसरत भरूचा, साकिब सलीम, दिव्या दत्ता, अक्षय ओबेरॉय, किकू शारदा आणि श्रद्धा दास असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश शाहने केले आहे तर नीरज पांडे आणि स्वत: मनोज बाजपेयी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.
