Amruta Khanvilkar on Emraan Hashmi: सध्या ओटीटीवर अनेक नवीन वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरिजची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही वेब सीरिज त्यापैकीच एक आहे. या वेब सीरिजमध्ये अमृता खानविलकरदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान हाश्मीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

अमृता खानविलकरने नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने इमरान हाश्मीचे कौतुक केले.ती म्हणाली, “सीरिजमध्ये आमच्या तिघांची म्हणजे माझी, इमरान आणि नंदिशची मैत्री दिसणं खूप गरजेचं होतं. कारण- सीरिजमध्ये आम्ही एका लेव्हलचे ऑफिसर्स आहोत. माझं जे पात्र आहे, ते मजा मस्ती करतं. बॉसला काहीही प्रश्न विचारु शकतं. कोनालाही जाऊन मारू शकतं. तर, सेटवरदेखील माझा तसाच वावर होता.”

पुढे ती म्हणाली, “मला युनिफॉर्म घालावा लागत नसे. मी शर्ट आणि पँट अशी माझी वेशभूषा होती. पण, ते बिचारे सतत पांढरा युनिफॉर्म घालायचे. पांढरे कपडे असल्याने काळजी घ्यावी लागायची. तर त्यांना माझ्याकडे बघून वाटायचं की तिला युनिफॉर्म का दिला नाही? आम्हालाच फक्त दिला आहे. तर अशा पद्धतीने आमच्यात बोलणे सुरू झाले.”

“इमरान हाश्मी यांच्यासाठी…”

इमरान हाश्मीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अमृता खानविलकर म्हणाली, “ते खूप उत्तम आहे. मी आणि नंदिश तुलनेने त्यांच्यापेक्षा ज्युनिअर कलाकार आहोत. त्यामुळे, त्यांच्याशी काय बोलू हा प्रश्न पडला असता. ते जर बोलके नसते, मैत्रीपूर्ण नसते, तितकी सहजता नसती. आमच्यात जी सहजता निर्माण झाली, त्याचे श्रेय त्यांना जाते.”

अमृता असेही म्हणाी, “इमरान हाश्मी यांच्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुली खूप वेड्या आहेत. मेकअप आर्टिस्ट आणि हेअरड्रेसर मुलींचे मला फोन आले होते की आम्हाला एकदा त्यांना भेटायचं आहे. इतकं इमरान हाश्मी यांचं फॅनफॉलोइंग आहे. ते जेंटलमन आहेत. यशस्वी असूनही ते अजिबात विचलीत होत नाहीत. त्याचं असं असतं की सेटवर आलं की काम करायचं आणि तिथून निघायचं आहे. भरपूर वाचन असणारा, हुशार, भाषेवरती प्रभुत्व असणारा माणूस आहे. मला वाटतं की खूप सुंदर ऑरा घेऊन येतात सेटवर आणि त्यामुळे काम करताना सहजता निर्माण होते. “

याच मुलाखतीत अमृता खानविलकरने ‘तस्करी: द स्मगलर्स’चे लेखक नीरज पांडे यांचेदेखील कौतुक केले. नीरज पांडे यांनी लिहिलेली फिल्म असो वा ओटीटीवरील वेब सीरिज असो, त्यांची पात्रे खूप वेगवेगळी असतात. ती पात्रे साकारताना मोठ्यातला मोठा स्टार हा स्टारसारखा वाटत नाही. त्यामुळे इमरान हाश्मी त्या वेब सीरिजमध्ये कस्टम ऑफिसर वाटतात. इमरान हाश्मी वाटत नाहीत. ते इतकं सुंदर लिहिलं गेलं आहे.

‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही वेब सीरिज १४ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजचे कौतुक होताना दिसत आहे.

दरम्यान, अमृता खानविलकर या वेब सीरिजबरोबर लग्नपंचमी या नाटकातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये तिच्याबरोबर स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे.