मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच ‘रफूचक्कर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रियाने इंडस्ट्रीतील नेपोटिझम आणि त्यावर होणाऱ्या चर्चांवर भाष्य केलं आहे. प्रिया नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीकडे कसं पाहते, तिला कधी घराणेशाहीचा अनुभव काम करताना आला आहे का? याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “तुम्ही सडपातळ असाल किंवा…”, ट्रोलिंग व बॉडी शेमिंगबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत, म्हणाली

प्रिया बापट ‘इंडिया टुडे’शी बोलताना म्हणाली, “मी घराणेशाहीकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहते. मला असं वाटतं की अभिनय पार्श्वभूमी असलेल्या ज्या कुटुंबातील मुलं इंडस्ट्रीत येऊ इच्छितात किंवा जे लोक त्यांना ब्रेक देण्यास तयार आहेत, त्यांना प्रश्न विचारणं योग्य नाही. मला साहजिकच माझा संघर्ष आणि प्रवास आणि त्यांचा प्रवास यात फरक दिसतो. माझ्यापेक्षा त्यांना खूप वेगाने संधी मिळतात हे उघड आहे.”

हेही वाचा – “माझं बॉबीवर खूप प्रेम होतं, पण…”; ५ वर्षांच्या अफेयरनंतर नीलमने सांगितलेलं ब्रेकअपचं कारण

यावेळी प्रियाने त्या व्यक्तीतील प्रतिभा महत्त्वाची असल्याचं म्हटलं. “त्यांना संधी जास्त मिळतात, हे खरंय पण मला वाटतं की जो प्रतिभावान असेल तो टिकून राहील. माझा प्रवास केवळ माझ्या अभिनयावर अवलंबून आहे. पहिला ब्रेक मिळविण्यासाठी मला खूप जास्त संघर्ष करावा लागला. होता. मी २० वर्षे इंडस्ट्रीत काम करत असूनही ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मिळण्यासाठी मला खूप वेळ लागला. गेल्या वर्षीच मी हिंदी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. बाहेरच्या व्यक्तीला इथे सेटल होण्यासाठी आणि ते कोण आहेत हे लोकांना कळण्यास आणि त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवण्यास वेळ लागतो. पण तो माझा संघर्ष आहे, त्यांचा वेगळा असेल. हे दोन वेगळ्या व्यक्तींचे दोन वेगळे प्रवास आहेत,” असं प्रियाने यावेळी नमूद केलं.

प्रियाच्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’च्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच १५ जूनपासून तिची ‘रफूचक्कर’ वेब सीरिज जिओ सिनेमावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये मनीष पॉल मुख्य भूमिकेत आहे. सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress priya bapat talks about nepotism in the industry hrc
First published on: 08-06-2023 at 16:37 IST