Vijay Verma Post : नागराज मंजुळे हे मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एका आहेत. त्यांनी आतापर्यंत हिंदी व मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अलीकडेच त्यांची ‘मटका किंग’ ही वेब सीरिज रिलीज झाली. यामध्ये बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये विजय वर्मासह मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर, कृतिका कामरा या अभिनेत्रीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर या सीरिजची खूप चर्चा झाली. अशातच आता विजयने नागराज मंजुळे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. यामधून त्याने त्यांच्याबरोबरचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

विजय वर्माने केलं नागराज मंजुळेंचं कौतुक

नागराज मंजुळे यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत कॅप्शनमधून विजय म्हणाला, ‘माझे दिग्दर्शक… दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबरोबर ‘मटका किंग’चा खरा किंगमेकर.’ यावेळी त्याने नागराज मंजुळे, कृतिका कामरा, सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबरचे मटका किंगच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून तो नागराज यांच्याबरोबर सेटवर संवाद साधताना दिसत आहे.

‘मटका किंग’ या चित्रपटात विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून सई ताम्हणकरने त्याच्या पत्नीची बर्खाची भूमिका साकारली आहे. त्यांच्याबरोबर यामध्ये सिद्धार्थ जाधव, गुल्शन ग्रोवर, विनित कुमार सिंह, भूपेंद्र जडावत, जेमी लिवर हे कलाकार पाहायला मिळत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ या सीरिजची त्यांनी सहनिर्मितीसुद्धा केली आहे. त्यांच्यासह सिद्धार्थ रॉय कपूर यांनीही या सीरिजची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेली ही सीरिज तिच्या कथेमुळे अनेकांचं लक्षं वेधून घेत आहे.

१७ एप्रिल रोजी ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली होती. ही सीरिज मुंबईतला एके काळचा मटका किंग रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित आहे. रतन खत्री हा पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण होता. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला. रतन खत्री याच्या मटक्याला ‘मेन बाजार’ म्हणून ओळख होती.