Matka King Release Date : ओटीटीवर सध्या एकापेक्षा एक अशा विविध आशयाच्या वेब सीरिज पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तर येत्या काळात काही नवीन वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीमार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या सीरिज आणि सिनेमांचा समावेश आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता विजय वर्मा.
विजय वर्मानं आतापर्यंत अनेक वेगवेगळे विषय असलेले चित्रपट व सीरिजमधून निरनिराळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता अभिनेता येत्या काळात एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर बऱ्याच दिवसांपासून त्याच्या या सीरिजची चर्चा सुरू आहे. अशातच, आता अखेर त्याची ही सीरिज रिलीज होणार आहे. विजय वर्मा त्याच्या आगामी ‘मटका किंग’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये त्याच्याबरोबर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तीसुद्धा यामधून वेगळ्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.
‘मटका किंग’ या सीरिजबद्दलची एक खास गोष्ट म्हणजे लोकप्रिय मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामध्ये मुंबईतील १९६० चा काळ पाहायला मिळणार आहे. विजय यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज एका साध्या कापूस व्यापाऱ्याची कथा सांगते, ज्याच्या एका कल्पनेमुळे मोठा बदल घडून आला. आता निर्मात्यांनी या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
विजय वर्माची ‘मटका किंग’ ही सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. ही सीरिज १७ एप्रिलला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं या सीरिजचा ट्रेलर पोस्ट करत ही माहिती दिली. समोर आलेल्या या ट्रेलरमधून विजयचा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय. त्याला जुगार खेळण्याची प्रचंड आवड असून, त्याला मटका किंग म्हणून ओळखलं जातं, असं यामधून पाहायला मिळतंय. विजयबरोबर या ट्रेलरमध्ये कृतिका कामरा पाहायला मिळत आहे. तर यासह या सीरिजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरची झलकसुद्धा दिसतेय. ती यामध्ये साडी नेसलेली मराठमोळ्या लूकमध्ये दिसतेय.
विजयची मुख्य भूमिका असलेल्या ‘मटका किंग’मध्ये त्याच्याबरोबर कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गुल्शन ग्रोवर, विनित कुमार सिंह, भूपेंद्र जडावत, जेमी लिवर हे कलाका र पाहायला मिळणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग या सीरिजची त्यांनी सहनिर्मितीसुद्धा केली आहे. त्यांच्यासह सिद्धार्थ रॉय कपूर यांनीही या सीरिजची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेली ही सीरिज तिच्या कथेमुळे अनेकांचं लक्षं वेधून घेत आहे.
