‘मटका किंग’ नावाची एक वेबसीरिज अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ या सीरिजमध्ये ब्रिज भट्टी ही मध्यवर्ती भूमिका अभिनेता विजय वर्माने साकारली आहे. या शिवाय सई ताम्हणकर, क्रितिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, किशोर कदम, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, गिरीश कुलकर्णी अशी मराठी कलाकारांची फौजही आहे. नागराज मंजुळेचं दिग्दर्शन असूनही ही सीरिज मुळीच वेगवान नाही किंवा पकड घेत नाही.
रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित आहे मटका किंग सीरिज
मुंबईतला एके काळचा मटका किंग रतन खत्री याच्या आयुष्यावर ही सीरिज बेतली आहे. रतन खत्री हा पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण होता. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला. रतन खत्री याच्या मटक्याला ‘मेन बाजार’ म्हणून ओळख होती. हिंदी सिनेमाला नेहमीच अशा वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची गरज आणि कुतूहलदेखील वाटत असते. रतन खत्री त्याला अपवाद नव्हता. रतन खत्री याच्या जीवनावर ‘धर्मात्मा’ हा चित्रपट आला तर ‘रंगीला रतन’ हा चित्रपट रतन खत्री याने स्वत:च निर्माण केला. असा पोलिस आणि समाजाच्या नजरेत ‘गुन्हेगार’ असलेला रतन खत्री मात्र कष्टकरी जनतेमध्ये खूपच विश्वास कमावून होता. हाच या सीरिजचा विषय आहे. मात्र मराठी कलाकारांची फौज आणि विजय वर्माची मध्यवर्ती भूमिका तसंच नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन सीरिजला तारु शकलेलं नाही.

एकूण ६ तास ४१ मिनिटांची सीरिज
मटका किंगच्या सीरिजमध्ये आठ भाग आहेत १) तकदीर, तदबीर, तरकीब २) उम्मीद का कारखाना ३) इज्जत हाफ, संगम फुल ४) तेरा प्यार ट्रिपल पाना, मेरा प्यार कबुतर दाना ५) सफेद कपडे, काले दिल ६) लाईट्स कॅमेरा जोडी ७) दो इक्के, एक गुलाम ८) ओपन और क्लोज अशा आठ भागांमध्ये ही सीरिज आहे. एकूण सहा तास ४१ मिनिटांच्या या सीरिजमध्ये वेगवान म्हणावा असा एकही प्रसंग नाही. सुरुवातीचा प्रसंग आणि ते वर्तुळ करणारा प्रसंग यांच्या मधला प्रवास म्हणजे ही सीरिज आहे. शिवाय संपूर्ण सीरिजमध्ये दोन ते तीन संवाद सोडले तर एकही संवाद प्रभावी किंवा छाप पाडणारा नाही. १९६० चं दशक आणि काळ चांगला उभा केला आहे. काही काही प्रसंग खरंच चांगले झाले आहेत. खासकरुन ब्रिज भट्टी पोलीस स्टेशनमध्ये असताना रात्रीचे नऊ वाजतात आणि तरीही मटक्याचे आकडे कसे ओपन होतात हा प्रसंग रंजक आहे. तसंच ब्रिज भट्टी पहिल्यांदा बरखाला रेसकोर्सवर घेऊन जातो तो प्रसंगही चांगला झाला आहे.
कलाकारांचा अभिनय कसा आहे?
गुलरुख (क्रितिका कामरा) अचानकच ब्रिज भट्टीच्या आयुष्यात येते असं दाखवण्यात आलं आहे. शिवाय तिला मटका या विषयात रस निर्माण होतो. तिचं जे काही पूर्वायुष्य दाखवलं गेलं आहे त्याला शेंडाबुडखा काहीही नाही. सई ताम्हणकरने या सीरिजमध्ये ब्रिज भट्टीच्या पत्नीची म्हणजेच बरखाची भूमिका केली आहे. सई ताम्हणकरने भूमिका चांगली केली असली तरी ती सतत एखाद्या दडपणाखाली आहे असं जाणवतं. तिचे आणि तिच्या मुलाचे काही प्रसंग चांगले झालेत. आधी सगळं हवहवंसं वाटणारी बरखा नंतर अचानक ब्रिज भट्टीचा तिरस्कारही करु लागते. गुलशन ग्रोव्हरने साकारलेला लालजीभाई हा त्या काळातल्या श्रीमंताचं प्रतिनिधीत्व करतो पण त्याने तो टिपिकल त्याच्या पद्धतीने साकारला आहे. त्यात नाविन्य असं काही नाही. ही भूमिका कुणीही करु शकलं असतं असं वाटतं. भरत जाधव, गिरीश कुलकर्णी आणि किशोर कदम या तिन्ही मराठी कलाकारांची मेहनत वाया घालवली आहे. त्यांना दिलेली भूमिका ते चोखपणे बजावतात पण पात्रं म्हणून ते तिघंही फसले आहेत असं पदोपदी जाणवत राहतं. सिद्धार्थ जाधवची भूमिका उठावदार झाली आहे, तो शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहतो हे विशेष. शिवाय मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या विजय वर्मानेही चांगलं काम केलं आहे. पण अख्खी सीरिज आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचं ओझं त्याच्या खांद्यावर असल्याने त्याचे खांदे वाकले आहेत हे स्पष्टपणे जाणवतं. तो अचानक पांढरे कपडे घालून का वावरु लागतो? तेदेखील अनाकलनीय आहे. शिवाय असे अनेक अनाकलनीय प्रसंग सीरिजमध्ये दिसून येतात. कलाकारांचा अभिनय चांगला असूनही पटकथेत सीरिज फसली आहे असं दिसतं.

नागराज मंजुळेंनीच ही सीरिज दिग्दर्शित केली आहे का?
दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांचं वेगळेपण सगळ्यांनाच ठाऊक आहे. सैराटसारखा गहिरा परिणाम करणारी कलाकृती नागराज मंजुळेंनी दिली आहे. पण मटका किंग पाहून ही सीरिज खरंच त्यांनी दिग्दर्शित केली आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ६ तास ४१ मिनिटं खिळवून ठेवलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा मंजुळेंकडून होती, पण ती ते पूर्ण करत नाहीत. तसंच सीरिजमध्ये गाणी आहेत जी नसती तरी चाललं असतं इतकी ती ‘एक्स्ट्रा’ वाटतात. ब्रिज भट्टीचं एकटं पडत जाणं ज्या पद्धतीने दाखवलं गेलं आहे ते फसल्यासारखं जाणवून येतं. शिवाय मटका पद्धत सुरु करण्याची कल्पना, त्यानंतर पाना, जोडी सारखे प्रयोग हे प्रसंग प्रभावीपणे दाखवता आले असते तसं घडत नाही. संपूर्ण सीरिजला एक शांतपणाचा आणि गंभीर असा टोन आहे. तो शेवट येईपर्यंत खटकत राहतो आणि हे या सीरिजचं सर्वात मोठं अपयश आहे असं जाणवतं. त्यामुळे ही सीरिज बघायची असेल तर आपल्या जबाबदारीवर पाहा, अर्थात फार अपेक्षा न ठेवता.
