Michael Jackson Biopic OTT Release JioHotstar: वीकेंड सुरू झाला असून जिओ हॉटस्टारवर आज (२९ ऑगस्ट रोजी) एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ९,७११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर हा २०२६ मधील जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातील ८० च्या दशकातील गाण्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सनचा बायोपिक ‘मायकल’ (Michael) आहे. आता हा चित्रपट भारतात ओटीटीवर रिलीज झालाय. मायकेल जॅक्सनच्या जयंतीनिमित्त तो जिओ हॉटस्टारच्या ‘द पीकॉक हब’वर (The Peacock Hub) रिलीज करण्यात आला आहे.
‘किंग ऑफ पॉप’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महान गायक मायकल जॅक्सनवर आधारित ‘मायकल’ चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रीमियर झाला आहे. यामध्ये मायकल जॅक्सनचा सुरुवातीच्या काळापासून ते जागतिक आयकॉन बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट फक्त इंग्रजी भाषेत रिलीज झाला होता, मात्र आता चाहत्यांना हा चित्रपट हिंदीतही पाहता येणार आहे.
‘मायकल’ चित्रपटाद्वारे मायकल जॅक्सन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात मायकेल जॅक्सनचा पुतण्या जाफर जॅक्सन याने मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय निया लाँग, केइलिन ड्युरेल जोन्स, लॉरा हॅरियर, जेसिका सुला, माइक मायर्स, माइल्स टेलर आणि कोलमॅन डोमिंगो हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
मायकल चित्रपटाचे बजेट व कलेक्शन
‘मायकंल’ चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट २०२६ मधील जगभरातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. १९१८ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १.०१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ९७११ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
मायकल जॅक्सन यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात त्यांच्या ८० च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यात समाविष्ट असलेल्या १३ गाण्यांमध्ये ‘जॅक्सन ५’ ची गाणी तसेच मायकल जॅक्सन यांच्या ‘ऑफ द वॉल’ (१९७९), ‘थ्रिलर’ (१९८२) आणि ‘बॅड’ (१९८७) या अल्बम्समधील गाण्यांचा समावेश आहे. १२७ मिनिटांच्या या चित्रपटात ५७:५५ मिनिटांची गाणी आहेत.
