मायकल जॅक्सन हा जगातील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याला कदाचित लोक कधीच विसरू शकणार नाही. त्याने जगातील लाखो करोडो लोकांचं त्याच्या गायनाने आणि नृत्याने मनोरंजन केलं. त्यामुळे त्याच्या निधनाच्या १७ वर्षांनंतरही आजही त्याची क्रेझ कायम आहे. त्याची गाणी, त्याचा डान्स सगळं आजही लोक पसंत करतात. अलीकडेच किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन चर्चेत आला ते त्याच्या ‘मायकल’ या बायोपिकमुळे. त्याच्या या बायोपिकने जगभरातील अनेक बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
मायकल जॅक्सनच्या भावाच्या मुलाने म्हणजेच त्याच्या सख्या पुतण्यानेच अभिनेता जाफर जॅक्सनने या चित्रपटात मायकलची भूमिका साकारली. जाफरने हुबेहुब त्याच्या काकाची भूमिका साकारत जगभरातील मायकलच्या अनेक चाहत्यांकडून कौतुकाची दाद मिळवली. त्याने या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली याचा अंदाचा चित्रपटातील त्याचा अभिनय, गायन आणि मायकलसारखाच त्याने केलेला डान्स पाहून कळतं. या सगळ्यामुळे आणि अर्थात मायकलमुळे या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडत कोट्यवधींची कमाई केली. अशातच आता ‘मायकल’ हा चरित्रपट ओटीटीवरही पाहता येणार आहे.
मायकलचा बायोपिक ओटीटीवर झाला रिलीज
मायकल जॅक्सनचा बायोपिक आता घरबसल्या ओटीटीवरही पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हा चरित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. तसेच थिएटरमध्येसुद्धा अजूनही मायकलचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन अजून पाहिला नाहिये किंवा ज्यांना बाहेर जाऊन सिनेमा पाहणं शक्य नाहीये अशा मायकलच्या चाहत्यांसाठी ही चांगली संधी आहे. आता त्यांना घर बसल्या किंग ऑफ पॉपचा जीवनप्रवास पाहता येणार आहे. इंग्रजीसह हिंदीतही हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘मायकल’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर याची निर्मिती स्वत जॅक्सन कुटुंबीयांनीच केली असून आंत्वां फुक्वा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. खरंतर मायकल त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला. आयुष्यात अनेकदा त्याला कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं. परंतु, या चित्रपटात त्याचं बालपण, जॅक्सन कुटुंब, त्याचे त्याच्या वडीलांबरोबरचे संबंध या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र त्याच्या आयुष्यातील कुठल्याही वादावर यामध्ये भाष्य करण्यात आलेलं नाहीये.
दरम्यान, ‘मायकल’ चरित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर या १८०० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ९,०५० कोटी रूपयांची विक्रमी कमाई केली आहे. भारतात ७०.७९ कोटींची कमाई केली आहे. आता थिएटरसह ओटीटीवरही हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तर येत्या काळात या चित्रपटाचा सीक्वलसुद्धा येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात मयाकलच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी, प्रसंग पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरेल.
