'मिर्झापूर'चा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा नवीन सीझन पाहता येईल. 'मिर्झापूर' सीरिजचे चाहते गेली चार वर्षे या बहुचर्चित तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अखेर प्रेक्षकांना चार वर्षांनंतर पंकज त्रिपाठींना साकारलेला कालीन भैय्या आणि अली फझलने साकारलेल्या गुड्डू पंडित यांच्यातील संघर्ष पाहता येणार आहे. 'मिर्झापूर'वर वर्चस्व गाजवण्यासाठी या दोघांमध्ये वाद चालू आहेत. या सीरिजमधील काल्पनिक कुटुंब नेमकी कोणती आहेत जाणून घेऊयात… हेही वाचा : भारतीय संघाचा विजयोत्सव पाहून शाहरुख खान झाला थक्क! विराट अन् रोहितचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला… त्रिपाठी कुटुंब 'मिर्झापूर'ची गोष्ट पंकज त्रिपाठींनी साकारलेल्या अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीन भैय्यापासून सुरू होते. कालीन हा 'मिर्झापूर'मधील सर्वात मोठा गुंड असून अवैध शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या व्यापारात त्याचा सहभाग असतो. कालीनच्या मुलाला म्हणजेच मुन्नाला आपल्या वडिलांना डावलून स्वत:कडे सगळे हक्क घ्यायचे असतात. परंतु, सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात, सीझन २ मध्ये कौटुंबिक प्रतिस्पर्धी गुड्डू पंडित (अली फझल) कडून मुन्ना मारला जातो. बीना (रसिका दुगल) ही त्रिपाठी घराण्याची सून दुसऱ्या भागात सत्यानंदची क्रूरपणे हत्या करून बदला घेते आणि कालीन व मुन्ना यांना मारण्यासाठी गुड्डू पंडितची मदत करते. या हल्ल्यात कालीन पळून जाण्यात यशस्वी होतो. पंडित कुटुंब मुन्ना आणि गुड्डू यांच्यात पहिल्या भागापासूनच टोकाचे वाद असतात. यांच्यातले वाद आणखी वाढतात जेव्हा त्यांना कळतं की, ते दोघंही एकाच मुलीवर प्रेम करतात. तिचं नाव असतं स्वीटी गुप्ता (श्रिया पिळगावकर). परंतु त्यानंतर गुड्डू आणि स्वीटी यांचं लग्न होतं आणि स्वीटी गरोदर राहते. ही गोष्ट मुन्नाला समजताच तो बबलू पंडित आणि स्वीटीची हत्या करतो. मात्र, गुड्डू गोलू ( श्वेता त्रिपाठी स्वीटीची बहीण ) आणि त्याची बहीण डिम्पी पंडितबरोबर पळून जाण्यात यशस्वी होतो. सीझन २ मध्ये गुड्डू बरा झाल्यावर पुन्हा एकदा मिर्झापूर काबीज करण्याची तयारी करतो. यावेळी गोलू ( श्वेता त्रिपाठी ) त्याच्या मदतीला असते. शेवटी बीना गोलू आणि गुड्डूची मदत करते. बीना मुन्ना आणि कालीनमधले मतभेद आणखी वाढवते परिणामी गुड्डू आणि गोलू मुन्नावर हल्ला करतात. यात मुन्नाचा मृत्यू होतो तर, कालीन भैय्या पळून जातो. गुप्ता कुटुंब गुप्ताजी हे 'मिर्झापूर'मधील पोलीस अधिकारी असतात व ते कालीन भैय्यासाठी काम देखील करतात. त्यांची मोठी मुलगी स्वीटीने मुन्नासोबत लग्न करावं अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, स्वीटी गुड्डू पंडितशी लग्न करते. त्यामुळे कालीन भैय्या गुप्ताजी यांना स्वीटीला विसरुन जा.आणि काही करून गोलूला शोधून काढा असं सांगतो. शुक्ला कुटुंब शुभ्रज्योती बारात यांनी साकारलेली रती शंकर शुक्ला ही भूमिका सीरिजमध्ये कालीन भैय्याच्या विरोधात असलेली व्यक्तिरेखा आहे. रती हा जौनपूर येथील एका नावाजलेल्या घरचा गुंड असतो. त्याला देखील मिर्झापूरवर राज्य करायचं असतं. सीझन १ मध्ये रतीची गुड्डू आणि बबलू हत्या करतात. त्यानंतर आता त्यांचा मुलगा शरद शुक्ला वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आला आहे. कालीन भैय्या विरोधात शरद मुन्नाशी हातमिळवणी करतो. परंतु, योग्य वेळ आल्यावर तो स्वत:चा बदला पूर्ण करणार असतो. हेही वाचा : शेतावर गेल्यानंतर मनाचा बकालपणा दूर होतो – नाना पाटेकर; ‘सागरिका म्युझिक’ कंपनीला २५ वर्षे पूर्ण, नाना पाटेकर यांचे कवी आणि गीतकार म्हणून पदार्पण त्यागी कुटुंब दद्दा त्यागी वाहनं चोरून काळ्या बाजारात विकत असतो. त्याला दोन जुळे मुलगे आहेत - शत्रुघ्न (लहान मुलगा) आणि भरत (मोठा मुलगा). भरत आणि शरद हे मित्र असल्याने, त्यागी कुटुंबाने शेवटी त्रिपाठी कुटुंबाशी हातमिळवणी केली आणि एकत्र बेकायदेशीर शस्त्रांचा व्यवसाय करण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, गोलू अफूच्या व्यवसायाचा करार करण्यासाठी शत्रुघ्नशी संपर्क साधते. जेव्हा ही गोष्ट त्यागीला कळते तेव्हा कुटुंबात विवाद होतात. शेवटी गोळीबारात दद्दा त्यागीचा एक मुलगा मरण पावतो. दोघांपैकी कोणाचा मृत्यू झाला हे अद्याप निश्चित झालेलं नाही. याचं रहस्य या सीझनमध्ये उलगडेल. यादव कुटुंब एसपी यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते कालीन भैय्याला निवडणुकीपूर्वी हिंसाचार कमी करण्यास सांगतात. कालीन भैया मुन्नाला माधुरी यादवला निवडणूक प्रचारात मदत करण्यास सांगतो. प्रचारादरम्यान माधुरीला मुन्नाबद्दल भावना निर्माण होतात. कालीन भैय्या मुन्नाला राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी माधुरीशी लग्न करण्याचा सल्ला देतो. दरम्यान, एसपी यादवचा धाकटा भाऊ जेपी यादव त्याला मारतो. यामुळेच माधुरी कालीन भैय्याबरोबर हातमिळवणी करून काम करते आणि जेपी यादवला सेक्स स्कँडलमध्ये अडकवते. कालीन भैय्याला वाटतं की माधुरीला मदत केल्यामुळे, तो पुढचा मुख्यमंत्री असेल पण, असं न होता पक्षाच्या बैठकीत निर्णय होऊन माधुरी स्वत: मुख्यमंत्री होते आणि मिर्झापूरमध्ये मोठा उलटफेर होतो. हेही वाचा : ‘YRF स्पाय युनिव्हर्स’मध्ये आलिया भट्टची एन्ट्री! जोडीला असेल महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात, सध्या ‘मुंज्या’मुळे आहे चर्चेत मकबूल हा कालीन भैय्याचा विश्वासू रक्षक असतो. त्याला कळते की, त्याचा स्वतःचा पुतण्या बाबर खान गुड्डू पंडितबरोबर काम करत असतो. आता 'मिर्झापूर ३' मध्ये कालीन व गुड्डी यांच्यात काय संघर्ष पाहायला मिळेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.