समीर जावळे
Mirzapur Season 3 OTT Review: बुद्धिबळाचा खेळ किती रंजक असतो हे आपल्याला माहीत आहेच. उंट, हत्ती घोडे, वजीर, राजा, प्यादी सगळ्यांच्याच आपल्या आपल्या चाली असतात. राजा आणि वजीर हे दोघं सोडले तर इतर कुणाच्याही बळी जाण्याला तितकंसं महत्त्व राहात नाही. तरीही खेळ रंगतदार होतो. मिर्झापूर चा सिझन थ्री पाहताना हा बुद्धिबळाचा रंजक खेळच आठवत राहतो. शह-काटशह आणि शेवटी कमालीचा ट्विस्ट या तंत्राने मिर्झापूर रंगवलं आहे.
कलाकारांची फौज आणि उत्तम सादरीकरण
पंकज त्रिपाठी (कालीन भय्या), अली फैजल (गुड्डू भय्या), श्वेता त्रिपाठी (गोलू), रसिका दुग्गल (बीना त्रिपाठी), विजय वर्मा (भरत त्यागी) अंजुम शर्मा (शरद शुक्ला), इशा तलवार (माधुरी यादव) अशा कलाकरांच्या अभिनयाने मिर्झापूर ३ सजलं आहे. या सगळ्यांचा अभिनय आणि सशक्त कथानक ही मिर्झापूर ३ ची खरी ओळख आहे. बाकी पहिल्या दोन सिझनप्रमाणेच या सिझनमध्येही रक्तरंजित प्रवास, हाणामारी, शिव्या, सेक्स सीन सगळं आहेच. पण मिर्झापूरची खरी मजा आणली आहे त्याच्या सादरीकरणाने.
प्रत्येक भागाचं नावही आहे खास
‘टेटुआ’, ‘मेक्सिको’, ‘प्रतिशोध’, ‘केकडा’, ‘त्राही’, ‘भस्मासूर’, ‘बम-पिलाट’, ‘राजा बेटा’, ‘अंश’ आणि ‘प्रतिबिंब’ या नावांचे दहा एपिसोड सिझन थ्रीमध्ये आहेत. या प्रत्येक एपिसोडची वीण दुसऱ्याशी घट्ट विणली गेली आहे. कारण प्रत्येक भाग संपल्यावर पुढच्या भागात काय? याची उत्कंठा लागून राहतेच.
काय आहे थोडक्यात मिर्झापूर ३ मध्ये?
कालीन भय्याचा मुलगा मुन्ना त्रिपाठीला मागच्या सिझनमध्ये गुड्डू आणि गोलूने संपवलं आहे. गुड्डू गोलूच्या हल्ल्यात मरणाच्या दारात पोहचलेल्या कालीन भय्याला घेऊन शरद शुक्ला त्याच्या घरी गेला आहे. इकडे सगळं मिर्झापूर गुड्डूने ताब्यात घेतलं आहे. मिर्झापूरच्या गादीवर गुड्डू बसला आहे. या नोटवर मिर्झापूरचा दुसरा सिझन संपला होता. तिसऱ्या सिझनची सुरुवातच मुन्ना त्रिपाठीच्या अंत्यसंस्काराच्या शॉटने दाखवली आहे. त्याची पत्नी माधुरी ही मुख्यमंत्री आहे. दहशत माजवणाऱ्या आणि बाहुबलींमध्ये वर्चस्व गाजवून स्वतःचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गुड्डूला तिला संपवायचं आहे. तिच्या मनात वडिलांच्या मृत्यूचं आणि त्यानंतर पतीच्या मृत्यूचं शल्य आहेच. शिवाय कालीन भय्या कुठे गेला, हेदेखील तिला ठाऊक नाही. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ती काय करते, राजकीय मर्यादा तिला अडवतात का? याचा प्रवास या पहिल्या शॉटपासूनच सुरु होतो.
शरद आणि गुड्डू यांच्यात वर्चस्वाची लढाई
दुसरीकडे शरद शुक्ला वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहतोय त्याच्या हाती आयताच घायाळ झालेला कालीन भय्या लागला आहे. त्याला बरोबर घेऊन शरदला मिर्झापूरची गादी मिळवायची आहे. त्यामुळे त्याच्या महत्त्वांकाक्षेसाठी तो लढतोय. तिसरीकडे गुड्डू आणि गोलू हे मिर्झापूरच्या त्रिपाठी हाऊसमध्ये कब्जा करुन बसले असले तरीही इतर बाहुबली जे आहेत त्यांच्यात आपण किती महत्त्वाचे आहोत हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे ही गुड्डूच्या वर्चस्वाचीही लढाई आहे. या सगळ्या ट्रॅकवर समांतर चालणारं मिर्झापूर ३ हे शह-काटशहाचं राजकारण कसं खेळलं जातं ते दाखवतंच. शिवाय त्यासाठी काय काय किंमत मोजावी लागू शकते याचाही विचार करायला भाग पाडतं.
मिर्झापूरच्या गादीपर्यंतचा गुड्डूचा संघर्ष
मिर्झापूरच्या गादीपर्यंत पोहोचेपर्यंत गुड्डूने त्याचा भाऊ (विक्रांत मेस्सी), त्याची प्रेयसी (श्रिया पिळगावकर) या सगळ्यांनाच गमावलं आहे. त्याचे वडीलही त्याच्या बरोबर उभे नाहीत, शिवाय त्याचं कुटुंबही त्याच्या विरोधात गेलं आहे. अशात त्याला साथ मिळते ती गुड्डूची. पण गुड्डूच्या आयुष्यात शत्रुघ्न त्यागी (विजय वर्मा) आला होता. त्या दोघांचं नातं किती तकलादू होतं ते फक्त डील होतं, हे मागच्या सिझनने सांगितलंच आहे. पण विजय वर्मा या सिझनमधलं सरप्राईज ठरला आहे. तो भरत त्यागी आहे की, शत्रुघ्न त्यागी याचं रहस्य खूप छान बाळगलं आहे. या सिझनमध्ये शरद शुक्लाच्या तोंडी एक संवाद आहे, “मिर्झापूर की गद्दीपर खरगोश भी बैठा हो तो उसे मारनेसे पहले सोचना पडता है.” अशा गादीवर गुड्डू बसला आहे. त्यामुळे त्याला संपवणं सोपं नाही हे शरदला ठाऊक आहे.
हे पण वाचा- ‘मिर्झापूर ३’ साठी ‘या’ अभिनेत्रीला मिळालं सर्वात कमी मानधन, तर गुड्डू पंडितने घेतली ‘इतकी’ रक्कम
बुद्धिबळातले डावपेच आणि रक्तरंजित राजकारण
एकीकडे डोक्यापेक्षा शक्ती वापरणारा गुड्डू दुसरीकडे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मानणारा शरद आणि त्याच्या पाठिशी असलेला अखंडानंद त्रिपाठी अर्थात कालीन भय्या या दोघांमधला हा सामना खरोखरच अनुभवण्याचा विषय ठरला आहे. गुड्डूसाठी रणनीती आखणारी गोलू आणि त्याला वारंवार सावध करणारी त्याची बहीण डिंपी या दोघींनीही त्यांच्या भूमिकांमध्ये जान ओतली आहे. पूर्वांचलवर राज्य करण्याचं स्वप्न गुड्डू पाहतो आहे. पण त्याचं ते स्वप्न तितकंसं सोपं नाही. सगळ्या गोष्टी बंदुकीच्या जोरावर आणि हाणामारी करुन साध्य करता येत नाहीत, हे त्याला ठाऊक आहे. तसंच सगळ्या गोष्टींमध्ये फक्त अक्कलहुशारी चालवून भागत नाही. खुर्ची मिळवायची असेल तर रक्त सांडावं लागतं याची कल्पना शरदलाही आहे. दोघंही त्यांच्या त्यांच्या पातळीवर वर्चस्वाची लढाई लढत आहेत. गुड्डूचा एक खास माणूस मरतो त्यानंतर अखंडानंद त्रिपाठी शरदला सांगतो की, तू आता बैठक बोलव आणि शांती प्रस्ताव मांड, दोन पावलं मागे ये म्हणजे तुला पुढे जाता येईल. त्या शांती प्रस्तावात गुड्डूची भेट घडवून आणतो तो एपिसोड थेट गॉडफादरची आठवण करुन देणारा ठरला आहे. डाव-प्रतिडाव, चाली, उत्कंठा, रक्तरंजित थरार या सगळ्याने ही सीरिज रंगली आहे.
अली फजल आणि पंकज त्रिपाठीचं खास कौतुक
अली फजल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, अंजुम शर्मा, इशा तलावर, रसिका दुग्गल या सगळ्यांनीच आपल्या आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. मात्र भाव खाऊन गेले आहेत दोन कलाकार. एक पंकज त्रिपाठी आणि दुसरा गुड्डू. पंकज त्रिपाठीची भूमिका पाहून सुरुवातीला प्रेक्षक म्हणून आपल्याला असं वाटतं की, याने ही भूमिका का स्वीकारली असावी? पण नंतर जो ट्विस्ट आहे त्यावरुन कळतं की पंकज त्रिपाठीसारखा हरहुन्नरी कलाकार भूमिका निवडताना चूक करणार नाही. तेवढाच गुड्डूच्या भूमिकेशी अली फजल समरस झाला आहे. एका प्रसंगात तो एक हत्या करतो, त्यावेळी गोलू त्याला विचारते अरे असं का वागलास? तेव्हा तो उत्तर देतो, “इसे कहते है आपदा को अवसरमें बदलना.” त्यावरुन गुड्डू पंडीत काय काय करु शकतो ते उलगडत जातं. या सिझनच्या एका प्रसंगाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो, तो म्हणजे गुड्डू पंडीत शहराताला कालीन भय्याचा पुतळा फोडून टाकतो तो प्रसंग. या प्रसंगाला दिग्दर्शकाने एक दुसरा प्रसंगही चपखलपणे जोडला आहे त्यामुळे या प्रसंगाची तीव्रता वाढली आहे.
उत्तम संवाद आणि जबरदस्त दिग्दर्शन
दिग्दर्शनाच्या बाबतीतही मिर्झापूर ३ सरस आहेच. गुरुमीत सिंग या दिग्दर्शकानेच या सीरिजचे आधीचे दोन भाग दिग्दर्शित केले आहेत. तसंच इनसाईड एज ही सीरिजही त्याची आहे. मात्र गुरुमीतने या सीरिजला दिलेला देशी तडका अगदी परफेक्ट बसला आहे. पहिल्या सिझनपेक्षा दुसरा किंवा तिसरा सिझन काही फार ग्रेट नसतो असं साधारण मानलं जातं. मात्र मिर्झापूर ३ हा सिझन पहिल्या दोन पेक्षा सरस आहे. याचं श्रेय अर्थातच गुरुमीतला आणि सीरिजच्या लेखकांना जातं. “मिर्झापूर में पावर हमेशा गद्दी की रही है और मुकाबला दावेदारोंका, खेल आजभी वहीं है बस मोहरे बदल गये हैं.” हे शरदच्या तोंडी असणारं वाक्य किंवा “व्हायलन्स हमारा यूएसपी है” हे गुड्डूच्या तोंडी असणारं वाक्य त्यांचे स्वभाव दाखवतात, आता अजून पुढे काय घडणार? हे पाहण्यास भाग पाडतात.
महिलांचं सिझन ३ मध्ये खास महत्त्व
बीना त्रिपाठी, माधुरी , गोलू या तिघींचंही या सीरिजमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. या तिघींच्या भूमिका चांगल्या झाल्या आहेत. माधुरी यादव ही मुख्यमंत्री दाखवली आहे. वडिलांमुळे ती राजकारणात आली आहे. गुन्हेगारीशिवाय राजकारण पुढे जात नाही, ते तिला माहीत आहे. गोलू तर गुड्डूचा राईट हँड आहे. तिच्या आयडीयाज आणि गुड्डूची शक्ती हातात हात घालून फिरतात. सगळ्यात कमाल केली आहे रसिका दुग्गलने. बीना त्रिपाठीच्या भूमिकेत तिने तिचे खास रंग भरले आहेत. ती गुड्डूच्या बाजूने आहे? , माधुरीच्या बाजूने आहे ? शरदच्या बाजूने आहे? की आणखी काही? तिची महत्त्वाकांक्षा आहे तरी काय, हा प्रश्न पडतो. सुरुवातीच्या दोन सिझनमध्ये साधीभोळी वाटणारी, नाडली गेलेली, शोषण झालेली बीना रसिका दुग्गलने रंगवली. यात तिची भूमिका घायाळ झालेल्या नागिणीसारखी आहे.
धक्कातंत्राचा उत्तम वापर
मिर्झापूरचा सिझन ३ अॅमेझॉन प्राईमवर आला आहे. या सिझनची चर्चाही रंगली आहे. कारण लोकांना फक्त हाणामारी, रक्तपात किंवा प्रेमकहाणी पाहायला आवडत नाही. चाली-प्रतिचालींचा खेळ, उंदीर-मांजराचा किंवा साप मुंगूसाचा खेळ हा जास्त भावतो आणि धक्कातंत्रही भावून जातंच. डोक्याने लढलेली लढाई आणि धक्कातंत्र हे राजकारणातलेही विशेष गुण आहेत. त्यामुळेच मिर्झापूरही प्रेक्षक म्हणून पकड पहिल्या भागापासूनच घेतं. सुरुवात ते शेवट आणि दिलेली ट्रिटमेंट याचा परिणाम मनात रुंजी घालत राहतो, चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान देतो यात शंका नाही. या सिझनला पाच पैकी साडेचार स्टार!
© IE Online Media Services (P) Ltd