Mirzapur Bold Scenes Anangsha Biswas : ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन आणि ग्रे भूमिका साकारून अभिनेत्री अनंग्शा बिस्वासने लक्ष वेधून घेतलं. तिनं साकारलेल्या झरीना बेगम या भूमिकेला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. राजकीय फायदा आणि महत्त्वकांक्षा यांसाठी ती तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा वापर करून घेत असल्याचे दाखवण्यात आले होते. या भूमिकेसाठी अनंग्शाने अभिनेता प्रमोद पाठक यांच्याबरोबर अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन शूट केले. पडद्यावर खूप सहज वाटणारे असे सीन प्रत्यक्षात शूट करणं किती अवघड असतं, याबद्दल अनंग्शानं खुलासा केला आहे.
सुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये अनंग्शा बिस्वासनं प्रमोद पाठक यांच्याबरोबर केलेल्या बोल्ड सीन शूटिंगचे अनुभव सांगितले. ती म्हणाली, “माझ्यासाठी सर्वांत अवघड कोणते सीन होते, तर ते प्रमोदजींबरोबर होते. ते खूप चांगले अभिनेते आणि व्यक्ती आहेत. लोकांना वाटतं की, किसिंग सीन करणं किंवा कोणत्याही प्रकारचा सेन्सुअस सीन करणं खूप सोपं असतं; पण खरं तर ते करणं खूप अवघड असतं.”
त्याच्या स्पर्शातून हेतू जाणवतो – अनंग्शा बिस्वास
अशा प्रसंगांच्या शूटिंग वेळी कलाकारांना नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं, हेही अनंग्शानं सांगितलं. ती म्हणाली, “बोल्ड सीन करताना एक तर१०० लोक तुमच्यासमोर असतात. त्यानंतर तुमच्याबरोबर असा सीन करणारा सहकलाकारही त्यावेळी तुमच्याइतकाच नर्व्हस असतो; पण आपण नर्व्हस आहोत हे कॅमेऱ्यासमोर दिसता कामा नये. त्यामुळे तुम्हाला बोल्ड सीनसुद्धा तितक्याच आत्मविश्वासानं करावे लागतात. त्यामुळे तुमचा सहकलाकार चांगला असला पाहिजे. कारण- त्याच्या स्पर्शातून हे जाणवतं की, त्याचा हेतू चांगला आणि स्वच्छ आहे.”
पुढे ‘मिर्झापूर’मधील बोल्ड सीनबद्दल ती म्हणाली, सगळ्या सीन्समध्ये माझ्यापेक्षा प्रमोदजी जास्त घाबरलेले होते. ते खूप चांगले आहेत आणि त्यावेळी त्यांनी मला खूप मदत केली,” शूटिंगच्या वेळी संपूर्ण टीम कलाकारांच्या सोईची आणि सुरक्षिततेची काळजी घेत असल्याचंही स्पष्ट करताना तिनं सांगितलं, “’मिर्झापूर’ची संपूर्ण टीम खूप बारकाईनं काम करते. म्हणजे तुम्हाला असे सीन करताना अस्वस्थ वाटणार नाही, याची काळजी ते घेतात.”
अनंग्शा बिस्वासनं ‘मिर्झापूर’मध्ये साकारलेली झरीना
अभिनेत्री अनंग्शा बिस्वासनं ‘मिर्झापूर’मध्ये साकारलेली झरीना ही व्यक्तिरेखा अत्यंत महत्त्वाकांक्षी दाखवण्यात आली आहे. कठीण परिस्थितीतून आलेली झरीना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाण्यास तयार असते. प्रमोद ऊर्फ जेपी यादवबरोबर तिचं नातंही दाखवण्यात आलं असून, ते भावनिक नाही, तर राजकीय फायद्यांसाठीचं नात असतं. राजकीय फायदा मिळवण्यासाठी या नात्यातील जवळीकीचा ती एखाद्या रणनीतीप्रमाणे वापर करून घेत असते.
‘मिर्झापूर : द मूव्ही’ कधी होणार रिलीज?
दरम्यान, ‘मिर्झापूर : द मूव्ही’ ही लोकप्रिय ओटीटी सीरिज आता सिनेमाच्या रूपामध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. वेब सीरिजमधील कालीन भैया, मुन्ना भैया व गुड्डू पंडित यांसारखी लोकप्रिय पात्रं सिनेमामध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहेत. अनंग्शा बिस्वासही झरीनाच्या भूमिकेत आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी ‘मिर्झापूर : द मूव्ही’ प्रदर्शित होणार आहे.
