या वीकेंडला ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ‘मिर्झापूर : द मूव्ही’पासून ते सायकोलॉजिकल थ्रिलर ‘ऑब्सेशन’पर्यंत अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि जिओहॉटस्टार या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर कोणते नवे चित्रपट आणि सीरिज पाहायला मिळणार आहेत, जाणून घेऊया…

‘ऑब्सेशन’ – २०२६ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेला ‘ऑब्सेशन’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. याची कथा बेअर (मायकेल जॉन्स्टन) या अबोल स्वभावाच्या तरुणाभोवती फिरते. त्याचं निक्की (इंडे नवारेत्ते)वर प्रेम असतं. मात्र, निक्कीनेही आपल्यावर प्रेम करावं यासाठी तो एका अलौकिक शक्ती असलेल्या वस्तूचा वापर करतो आणि त्यानंतर सगळंच बदलतं. निक्कीचं बेअरवरील प्रेम हळूहळू वाढत जातं. ती त्याचा सतत पाठलाग करू लागते आणि या दोघांच्या आयुष्यात भयंकर घटना घडू लागतात. हा चित्रपट ३० ऑक्टोबरपासून जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.

‘मिर्झापूर : द मूव्ही’ – लोकप्रिय क्राइम फ्रँचायझी ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा या विश्वात रमण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या सीझनच्या कालखंडातील एका न सांगितलेल्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. मिर्झापूरच्या गादीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष, वैर आणि सत्तेची लढाई यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अली फजल, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू आणि रसिका दुग्गल हे कलाकार त्यांच्या लोकप्रिय व्यक्तिरेखांमध्ये पुन्हा दिसणार आहेत. तर जितेंद्र कुमार, रवी किशन आणि सोनल चौहान यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात यापूर्वी न पाहिलेली दृश्यं असलेला एक्स्टेंडेड कटदेखील पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओवर ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध झाला आहे.

‘मीठे में क्या है’ – कौटुंबिक नाट्य पाहायला आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मीठे में क्या है’ हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो. अनेक पिढ्या एकत्र राहणाऱ्या कुटुंबातील गुंतागुंतीची नाती आणि त्यांच्यातील मतभेद यांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेली रहस्यं आणि वेगवेगळे दृष्टिकोन यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो. अशातच सणाच्या आनंदात एका अनपेक्षित लग्नाच्या घोषणेने कुटुंबात नवं वादळ निर्माण होतं. या घोषणेमुळे जुने वाद आणि दडलेल्या गोष्टी पुन्हा समोर येतात. हा चित्रपट ३० ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला होणार आहे.

‘ड्राइव्ह : द प्रिटेंडर्स’ (प्राइम व्हिडीओ) – तमारा लश यांच्या कादंबरीवर आधारित ‘ड्राइव्ह : द प्रिटेंडर्स’ हा जर्मन रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. व्यावसायिक कार रेसिंगच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये दांते अन्नुनझियाता (अमीन बाहमेद) हा वादग्रस्त फॉर्म्युला वन चॅम्पियन असून सारा जेनकिन्स (लिसा-मारी कोरोळ) ही रेसिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारी पिट मेकॅनिक आहे. आपली खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी दांते सारासमोर खोट्या साखरपुड्याचा प्रस्ताव ठेवतो. मात्र, या नात्याचं नाटक करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर रेसिंग विश्वातील स्पर्धा आणि आव्हानांसोबतच त्यांच्या नात्यातही नवी गुंतागुंत निर्माण होते. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे.