दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांची लेक विस्मया मोहनलाल हिचा पदार्पणातील चित्रपट ‘थुडक्कम’ ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मल्याळम सिनेसृष्टीतील विस्मयाचा हा पहिलाच चित्रपट आता थिएटरनंतर लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

‘थुडक्कम’ चित्रपटात (Thudakkam) मीनू नावाच्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे.मीनू ही मार्शल आर्ट्सची खेळाडू आहे. दोन शाळकरी मुलींना सुरक्षितपणे घरी पोहोचवल्यानंतर ती एका धोकादायक स्टॉकरच्या निशाण्यावर येते. मीनू तिचे मध्यमवयीन आणि दिव्यांग वडील रवी यांच्याबरोबर राहते. रवी हे गावातील अधिकारी आहेत. मुलींना सुरक्षित घरी पोहोचवण्यासारख्या तिच्या या साध्या कृतीमुळे एका निर्दयी आणि धोकादायक अनोळखी व्यक्तीचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे, याची मीनूला लवकरच जाणीव होते. या व्यक्तीचा भूतकाळही गूढ आहे.

स्टॉकर तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू लागल्यानंतर मीनूला अनेक त्रासदायक आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण, वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत आणि स्थानिक अधिकाऱ्यांची उदासीनता अशा अनेक अडचणींशीही तिला झगडावं लागतं. मीनू अचानक गायब झाल्यानंतर तिचा धोकादायक पद्धतीने पाठलाग सुरू होतो. दरम्यान, पोलिसांच्या तपासादरम्यान तिचं कुटुंबीयही अस्वस्थपणे या सगळ्यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात.

ओटीटीवर कधी आणि कुठे रिलीज होणार ‘थुडक्कम’?

‘थुडक्कम’ हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी जिओ हॉटस्टार (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. जिओ हॉटस्टारने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत माहिती दिली आहे.

‘थुडक्कम’मध्ये विस्मया मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. तिच्याबरोबर निर्माते अँटनी पेरुंबवूर यांचा मुलगा आशीष जो अँटनी मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. मुख्य कलाकारांव्यतिरिक्त बॉबी कुरियन, साई कुमार, मनोज के. जयन, के. बी. गणेश कुमार, चिप्पी रंजीत, कोट्टायम रमेश, जया कुरुप, जाफर इडुक्की, टी. जी. रवी आणि मिया जॉर्ज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विशेष म्हणजे मोहनलाल यांचाही या चित्रपटात कॅमिओ आहे.