Pooja Meri Jaan Release Date: मृणाल ठाकूर आणि हुमा कुरैशी यांचा पूजा मेरी जान हा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चार वर्षांपासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. त्याचे कारण म्हणजे २०२२ मध्येच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यानंतर सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची सर्वांना प्रतीक्षा होती.
‘पूजा मेरी जान’ हा थ्रिलर सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित
आता झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मने या सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. तसेच, सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे, त्याची तारीखही सांगितली आहे. हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेय की, काही गोष्टी तुम्ही काय पाहत आहात याचा विचार करण्यास प्रवृत्त करतात. काही गोष्टी तुम तुमच्यासमोर श्रद्धांवर प्रश्न उपस्थित करतात. ही गोष्ट तुम्हाला या दोन्हींच्या मधल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्यास भाग पाडेल.”
या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि हुमा कुरैशी यांच्याबरोबर विजय राज आणि विक्रम सिंह हे कलाकारही प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. पटकथा आणि संवाद निरेन भट्ट यांनी लिहिले असून, विपाशा अरविंद यांनी सह-दिग्दर्शन केले आहे.
टीझरची सुरुवात एका भयावह दृश्याने होते. टीझरमध्ये पाहायला मिळते की, पूजा नावाच्या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडकडून एक मेसेज येतो. तो मेसेज असा की पूजा, जर तू हो म्हणालीस, तर आपलं प्रेम इतिहास घडवेल आणि जर तू नाही म्हणालीस, तर मी इतिहास बनेन. टीझरमध्ये रोमँटिक सीनची झलक पाहायला मिळते. तसेच पूजा किंचाळताना, रडतानाही दिसते. त्याबरोबरच न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या एक सना नावाची वकिलाचीही झलक पाहायला मिळते. पूजा ही भूमिका मृणाल ठाकूरने साकारली आहे; तर हुमा सनाच्या म्हणजेच वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमाबद्दल बोलायचे, तर सिनेमाची गोष्ट पूजाच्या अवतीभोवती फिरते. पूजाचा बॉयफ्रेंड अनिकेत आत्महत्या करतो. पूजाने आत्महत्या करण्यासाठी त्याला प्रवृत्त केले आहे, असा आरोप पूजावर केला जातो. या सगळ्यात पूजाची मैत्रीण सना तिची साथ देते. आता सिनेमात नेमके काय घडते, पूजा या प्रकरणातून निर्दोषपणे बाहेर पडते का, तसेच सना तिला कशी मदत करते या सगळ्या गोष्टी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, मृणाल आणि हुमाचा हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
