Mahima Makwana Inspirational Journey : बालपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर चाळीत राहून हलाखीचे दिवस काढणाऱ्या अभिनेत्री महिमा मकवानाचा संघर्ष प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महिमाने अवघ्या १४ व्या वर्षी मुंबईत स्वतःचे घर आणि गाडी खरेदी केली होती. सध्या नेटफ्लिक्सच्या ‘मुसाफिर कॅफे’ या सीरिजमध्ये झळकणाऱ्या २५ वर्षांच्या महिमाने आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शाळा सांभाळून ऑडिशन्स दिल्या. नातेवाईकांनी हीन दर्जाचे समजल्यानंतरही महिमाने हार मानली नाही. जाणून घेऊयात तिची संघर्षाची कहाणी.
२०२१ मध्ये रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये महिमाने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगितला होता. महिमाचं आयुष्य अगदी लहान वयातच बदललं होतं. “माझे वडील वारले तेव्हा मी फक्त पाच महिन्यांची होते. त्या काळात माझी आई एका एनजीओमध्ये काम करायची आणि माझा भाऊ नऊ वर्षांचा होता. माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं, पण ती बनू शकली नाही, म्हणून तिने मला अभिनयाकडे वळवलं,” असं महिमा मकवानाने सांगितलं.
९ वर्षांची असताना ऑडिशन द्यायला सुरुवात केली – महिमा मकवाना
“मी ९ वर्षांची असताना ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मी माझ्या आईला सांगायचे की मला अभिनयात काहीच रस नाही. मला या इंडस्ट्रीबद्दल काहीच कळायचं नाही. मी अर्धा दिवस शाळेत जायचे, बसने प्रवास करून ऑडिशन्सला जायचे आणि थकून घरी यायचे. पण माझी आई मला सातत्याने प्रोत्साहन द्यायची. मला माझ्या कुटुंबाला हातभार लावायचा होता, म्हणून मी या इंडस्ट्रीत आले,” असं महिमाने सांगितलं.
चाळीत राहायची महिमा मकवाना
महिमा या क्षेत्रात तिच्यावरील जबाबदारीमुळे आली, पण त्याची किंमत तिला मोजावी लागली. तिला आपलं बालपण जगता आलं नाही. तिला इतर मुलांप्रमाणे शाळा किंवा कॉलेजचं आयुष्य जगायला मिळालं नाही. “कुटुंबात कमवणारं दुसरं कोणीच नव्हतं. आम्ही चाळीत राहायचो. नातेवाईकांसह इतरही लोक आम्हाला हीन दर्जाचे समजायचे.” आईच्या एका वाक्याने आपलं आयुष्य बदललं, असं महिमा सांगते. एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं की, मरण्यापूर्वी तिला स्वतःचं घर हवं आहे आणि आईची हीच इच्छा पूर्ण करायचं महिमाने ठरवलं.
महिमा मकवानाने १४ व्या वर्षी घेतलेलं पहिलं घर
२०१२ मध्ये झी टीव्हीवरील ‘सपने सुहाने लडकपन के’ या मालिकेने महिमाला मोठी ओळख मिळवून दिली. त्या वेळी ती फक्त १३ वर्षांची होती. या मालिकेच्या यशाने तिची व तिच्या कुटुंबाची परिस्थिती रातोरात बदलली. “त्या मालिकेनंतर मी माझं पहिलं घर विकत घेतलं. मी फक्त १४ वर्षांची होते. मी मिरा रोडमध्ये घर घेतलं आणि माझी पहिली कारही खरेदी केली.”
महिमा मकवानाचे दुसरे घर
अवघ्या १४ व्या वर्षी पहिले घर खरेदी केल्यानंतर एका दशकानंतर महिमाने दुसरे घर घेतले. गेल्या वर्षी तिने मुंबईतील तिच्या दुसऱ्या घराची झलक चाहत्यांना दाखवली, त्या घरात ती तिच्या आईबरोबर राहते. हे घर तिने तिच्या मनासारखं सजवून घेतलंय. “मी माझं पहिलं घर २०१४ मध्ये खरेदी केलं होतं. त्या वेळी मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर असणे म्हणजे काय, हे मला समजलेच नव्हते. ११ वर्षांनंतर आज माझ्याकडे दुसरे घर आहे, जे पहिल्यापेक्षा खूप मोठे आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे,” असं ‘मॅशेबल इंडिया’शी बोलताना महिमा म्हणाली.
दरम्यान, महिमाने २०१७ मध्ये ‘व्यंकटपुरम’ या चित्रपटातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘अंतिम’, ‘तुमसे ना हो पायेगा’, ‘शोटाइम’ आणि नुकत्याच आलेल्या ‘मुसाफिर कॅफे’ यांसारख्या कलाकृतींमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर महिमाने अनेक जाहिरांमध्येही काम केलंय.
