Musafir Cafe Season 2 Netflix Announcement: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज सध्या तुफान गाजत आहे. प्रसिद्ध लेखक दिव्य प्रकाश दुबे यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या ब्लॉकबस्टर प्रतिसादानंतर आता नेटफ्लिक्सने अधिकृत पोस्ट शेअर करत ‘मुसाफिर कॅफे सीझन २’ची (Musafir Cafe Season 2) घोषणा करून चाहत्यांना मोठी खूशखबर दिली आहे.
‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज लोकप्रिय लेखक दिव्य प्रकाश दुबे यांच्या याच नावाच्या प्रसिद्ध हिंदी कादंबरीवर आधारित आहे. ही कथा चंदर, सुधा आणि प्रीती या तीन पात्रांभोवती फिरते. या सीरिजमध्ये चंदरही भूमिका विक्रांत मॅस्सीने साकारली आहे. वेदिता पिंटो हिने सुधाची भूमिका केली असून महिमा मकवाना प्रीतीच्या भूमिकेत आहे.
‘मुसाफिर कॅफे’ची कथा
चंदर हा स्वतःच्या अस्तित्वाचा आणि समाधानाचा शोध घेणारा एक तरुण आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने त्याची भेट सुधाशी होते. स्वतःच्या अटींवर जगू इच्छिणारी आणि करिअरला प्राधान्य देणारी सुधा चंदरच्या प्रेमात पडते, पण मुंबईत मिळालेल्या करिअरच्या संधीमुळे त्यांच्या नात्यात आणि तिच्या आयुष्यात मोठा निर्णय घ्यावा लागतो. काळाच्या ओघात चंदरचे आयुष्य बदलते आणि तो मसुरीच्या निसर्गरम्य वातावरणात प्रीतीसोबत एका ‘कॅफे’ची सुरुवात करतो. मात्र भूतकाळातील आठवणी, अपूर्ण राहिलेले प्रेम आणि आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय यांचा प्रभाव त्यांच्या नात्यावर कसा पडतो, हे या सीरिजमध्ये दाखवले आहे.
भोपाळ आणि मसुरी या सुंदर शहरांमध्ये चित्रित झालेली ही कथा प्रेम, मैत्री, करिअर आणि आयुष्यातील चुका-निर्णयांचा एक हळवा प्रवास दाखवते. ही वेब सीरिज २४ जुलै २०२६ रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
‘मुसाफिर कॅफे’ मधील कलाकार
या सीरिजमध्ये विक्रांत, महिमा व वेदिकाबरोबरच आदिल हुसेन, राजीव सिद्धार्थ, अनुभा फतेहपुरिया, लव्हलीन मिश्रा व सादिया सिद्धीकी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन रुचीर अरुण यांनी केले आहे. तर विक्रांत मॅस्सीच्या ‘होममेड स्टोरीज’ने निर्मिती केली आहे.
