गेल्या काही दिवसांपासून ‘मुसाफिर कॅफे’ या सीरिजची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दिव्य प्रकाश दुबे यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या या सीरिजला ओटीटीवर प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीरिजची कथा, माडंणी आणि कलाकारांचा अभिनय याबद्दल अनेक जण कौतुक करत आहेत. पुस्तकांमधील कथा जेव्हा पडद्यावर मांडल्या जातात, तेव्हा त्या आणखी रंजक वाटू लागतात. पुस्तकांवर आधारित अनेक कलाकृतींनी मोठ्या पडद्यावर यश मिळवलं आहे. मात्र, सध्या ओटीटीच्या माध्यमातून वेब सीरिजच्या स्वरूपातही अशा साहित्यकृतींना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
नुकतीच प्रदर्शित झालेली ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिजही एका कादंबरीवर आधारित आहे. महिमा मकवाना, विक्रांत मॅस्सी आणि वेदिका पिंटो यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही रोमँटिक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली असून, ओटीटी प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण फक्त ‘मुसाफिर कॅफे’च नाही, तर पुस्तकांवर आधारित अशा अनेक वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाल्या असून त्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अशाच पुस्तकांवर आधारित ७ उत्कृष्ट वेब सीरिजबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या त्यांच्या दमदार कथेमुळे आणि सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ – १९४७ मधील भारताची फाळणी आणि ब्रिटिश राजवटीच्या अखेरच्या दिवसांतील घडामोडींचं प्रभावी चित्रण ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळतं. या ड्रामा सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. IMDb वर ८.४ रेटिंग मिळालेली ही लोकप्रिय सीरिज डॉमिनिक लापिएर आणि लॅरी कॉलिन्स यांनी लिहिलेल्या ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकावर आधारित आहे.
द फ्रीलान्सर – दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या ‘द फ्रीलान्सर’ या गाजलेल्या वेब सीरिजची कथा आयसिसच्या ताब्यात असलेल्या सीरियामध्ये अडकलेल्या एका महिलेच्या सुटकेभोवती फिरते. मोहित रैना अभिनित ही सीरिज शिरीष थोरात यांच्या ‘अ टिकीट टू सीरिया’ या पुस्तकावर आधारित आहे. या वेब सीरिजला IMDb वर ८.१ रेटिंग मिळालं आहे.
ब्लॅक वॉरंट – क्राइम आणि पोलिसांवरील अनेक थरारक वेब सीरिज तुम्ही पाहिल्या असतील, मात्र २०२५ मध्ये प्रदर्शित झालेली ‘ब्लॅक वॉरंट’ ही त्यापेक्षा वेगळी ठरली. या सीरिजमध्ये तुरुंग अधिकाऱ्याचा संघर्ष आणि कारागृहातील वास्तववादी जग प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आलं आहे. जहान कपूर अभिनित या वेब सीरिजला IMDb वर ७.९ रेटिंग मिळालं आहे. ही सीरिज सुनील गुप्ता आणि सुनेत्रा चौधरी यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ या पुस्तकाचं हिंदी रूपांतर आहे.
खाकी : द बिहार चॅप्टर – आयपीएस अधिकारी अमित लोढा यांनी लिहिलेल्या ‘बिहार डायरीज’ या पुस्तकावर आधारित ‘खाकी : द बिहार चॅप्टर’ ही वेब सीरिजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. करण टॅकर आणि अविनाश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या ७ भागांच्या सीरिजला ओटीटीवर आजही मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. या वेब सीरिजला IMDb वर ८.१ रेटिंग मिळालं आहे.
पाताल लोक – जयदीप अहलावत अभिनित ‘पाताल लोक’ ही गाजलेली वेब सीरिजही एका पुस्तकातून प्रेरित आहे. प्राइम व्हिडीओवरील या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले असून, दोन्ही सीझनना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. MDb वर ८.२ रेटिंग असलेल्या या सीरिजची कथा लेखक तरुण तेजपाल यांच्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन’ या पुस्तकावर आधारित असल्याचं मानलं जातं.
