Nana Patekar on Prakash Jha: नाना पाटेकर काही दिवसांपासून ‘संकल्प’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ही एक पॉलिटिकल थ्रिलर वेब सीरिज आहे. अमेझॉन एमएक्स प्लेअरवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. नाना पाटेकरांनी या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

संकल्प या वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर यांच्यासह संजय कपूर, मोहम्मद जीशान अय्यूब, नीरज काबी, कुब्रा सैत व क्रांती प्रकाश हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत. ११ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या संकल्प या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.

आता एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी प्रकाश झा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तसेच, संकल्प वेब सीरिजमधील कलाकारांबरोबरच्या बॉण्डिंगबद्दलही वक्तव्य केले आहे.

Award Banner

“त्यामुळे सेटवर अनेक गोष्टी…”

नाना पाटेकर यांनी ‘शोशा’बरोबर संवाद साधला. कलाकारांबरोबरच्या बॉण्डिंगबद्दलही नाना पाटेकर म्हणाले, “मी खरे सांगतो, संध्याकाळी संपूर्ण युनिट एकत्र बसते. एकत्र जेवण करते. सगळे जण गप्पा मारतात. त्यामधून जे आपापसांत बॉण्डिंग तयार होते. त्यामुळे सेटवर अनेक गोष्टी सोप्या होतात. लोकांना वाटते की, फक्त जेवण तयार झाले आहे; पण खरे तर तिथे कुटुंब तयार होते.”

“एकमेकांच्या चांगल्या-वाईट गोष्टी…”

पुढे नाना पाटेकरांनी प्रकाश झा यांच्याबरोबर त्यांचे जे नाते आहे. दीर्घकाळापासून त्यांच्यात जे समीकरण आहे, त्यावरही वक्तव्य केले. नाना पाटेकर म्हणाले, “एकमेकांच्या चांगल्या-वाईट गोष्टी जेव्हा माहीत होतात, तेव्हा मैत्री होते. तुझ्यात हे वाईट गुण आहेत, असं आपण म्हणत नाही. त्या सगळ्या चांगल्या-वाईट गुणांसह प्रकाश झा यांनी मला आपलंसं केलं आहे.” ते असेही म्हणाले की, एकमेकांनी समजून घेतल्यामुळे वैयक्तिक उणिवा असूनही एकत्र काम करणं शक्य झालं.

नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. मराठीसह त्यांनी अनेक हिंदी सिनेमांतही काम केले आहे. त्यांनी गंभीर भूमिकांसह विनोदी भूमिकादेखील साकारल्या. वेलकम हा त्यापैकी एक चित्रपट आहे.

दरम्यान, वेलकम टू द जंगल या सिनेमात नाना पाटेकर व अनिल कपूर दिसणार नाहीत म्हणून चाहते नाराज झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर व अनिल कपूर दोघेही ‘वेलकम ४’मध्ये दिसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.