Nana Patekar Debut Series Teaser Release : नाना पाटेकर यांनी आतापर्यंत मराठी व हिंदी चित्रपट, नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांचं अनेकदा कौतुक होत असतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘ओ रोमिओ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अशातच आता नाना पाटेकर लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
नाना पाटेकर अनेकदा सामाजिक मुद्दयांवर त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अशातच आता सामाजिक आणि राजकीय विषयावर आधारित एका सीरिजमधून नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नाना पाटेकर यांच्या आगामी सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
नाना पाटेकर ‘या’ सीरिजमधून ओटीटीवर करणार पदार्पण
नाना पाटेकर यांच्या आगामी ‘संकल्प’ या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्यांच्यासह संजय कपूरसुद्धा झळकणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या २.२ सेकंदाच्या ट्रेलरने अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये बिहार येथील राजकारणातील बदलाच्या भावना, गुरू-शिष्याचं नातं आणि सत्तेसाठीची लढाई हे खूप उत्कृष्टपणे दाखवण्यात आलं आहे. यामध्ये सत्तेसाठीचा संघर्ष, राजकारणातील डावपेच आणि नोकरशाही असं काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. सीरिजची कथा या भोवती फिरते.
सीरिजच्या कास्टबद्दल बोलायचं झालं तर स्वतः नाना पाटेकर या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. यामधून ते पहिल्यांदाच सीरिज या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नाना पाटेकर यामध्ये एका शिक्षकाच्या भूमिकेतून झळकणार आहेत. आधुनिक भारताच्या संदर्भात राजनैतिक रणनीतीचे नवीन अंदाज पाहायला मिळणाऱ्या या सीरिजमधून नाना पाटेकर यांच्याबरोबर संजय कपूर, मोहम्मद जीशान अय्यूब, नीरज काबी, कुब्रा सैत आणि क्रांती प्रकाश झा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत.
‘संकल्प’ सीरिजची कथा
ही कथा देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या केंद्रांभोवती फिरते. यात मास्टर साहेब नावाच्या प्रभावशाली शिक्षकाचं पात्र दाखवलं आहे, ज्यांचा प्रभाव त्यांच्या मूल्यांवर, निष्ठेवर आणि अटळ समर्पणावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये गुरू आणि शिष्य यांच्यात होणारा तीव्र संघर्ष हळूहळू उलगडत जातो. यात महत्त्वाकांक्षेची नैतिक किंमत आणि मार्गदर्शन व वर्चस्व गाजवण्यामधील अतिशय बारीक रेषा अधोरेखित केली आहे. त्यानंतर सुरू होणारी ही संघर्षपूर्ण कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते, कारण शिष्य आपल्या गुरूविरोधात पुढे जाऊ शकतो का, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेली ‘संकल्प’ ही सीरिज ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
