Shahid Kapoor O’Romeo OTT Release : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा ‘ओ रोमिओ’ हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. त्यानंतर आता जवळपास महिनाभराने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘हैदर’नंतर दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांची जोडी पुन्हा एकदा ‘ओ रोमिओ’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ‘ओ रोमिओ’ अमेरिकेत प्रचलित असणाऱ्या ‘वेस्टर्न स्टोरीज’ या कथानकावर आधारित सिनेमा वाटतो, ज्याची कहाणी मात्र मुंबईतील रस्त्यावर घडली आहे, त्यामुळे हा अॅक्शनपट ज्यांना मोठ्या पडद्यावर पाहता आला नाहीये, त्यांना तो आता घरबसल्या पाहता येणार आहे.

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘ओ रोमिओ’

हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर स्ट्रीम होणार आहे. प्राइम व्हिडीओच्या नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट २७ मार्चपासून ओटीटीवर उपलब्ध होईल.

Award Banner

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २७ मार्चपासून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना वेगळे पैसे मोजावे लागतील. सध्या हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर ‘रेंट’वर उपलब्ध करून दिला जात आहे. ज्यांच्याकडे प्राइमचे सबस्क्रिप्शन आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट बहुधा एप्रिल महिन्यात मोफत उपलब्ध होऊ शकतो, मात्र त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी ‘पे-पर-व्ह्यू’ (Pay-per-view) म्हणजेच पैसे देऊन चित्रपट पाहण्याची पद्धत लोकप्रिय होत आहे. ‘ओ रोमिओ’च्या बाबतीतही हाच प्रयोग केला जात आहे. रेंटचा कालावधी संपल्यानंतर, साधारण एप्रिलमध्ये हा चित्रपट सर्व सबस्क्राइबर्सना पाहता येईल.

‘ओ रोमिओ’कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारशी कमाल दाखवता आली नाही. १३० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात साधारण ७२ कोटी कमावले, तर जगभरात चित्रपटाने जेमतेम १०० कोटींचा टप्पा गाठला. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर रेंटवर पाहण्यासाठी सज्ज आहे.

‘ओ रोमिओ’मध्ये आहे ‘या’ कलाकारांची मांदियाळी

शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यासह रणदीप हुड्डा, दिशा पटानी, फरीदा जलाल, शक्ती कपूर, राम कपूर आणि तमन्ना भाटिया, सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी, दिया मिर्झा, तनिषा मुखर्जी, तारा शर्मा आणि रोशनी वालिया आदी कलाकार या चित्रपटात आहेत. शिवाय नाना पाटेकर आणि गायक राहुल देशपांडे हे दोन मराठमोळे चेहरेसुद्धा या चित्रपटात झळकले आहेत.