गेल्या तीन-चार दिवसांपासून ओटीटीवर एक जुना चित्रपट अचानक ट्रेंड होऊ लागला आहे. दोन वर्षे जुना एक अॅक्शन ड्रामा चित्रपट अचानक ट्रेंडिंगमध्ये आला आहे. रंजक बाब अशी की मूळ तेलुगू भाषेतील या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग फक्त ५.८ आहे, तरीही तो मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. या चित्रपटात काजल अग्रवाल, श्रीलीला या दोन अभिनेत्री आहे. तसेच बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचं नाव ‘भगवंत केसरी’ आहे.
‘भगवंत केसरी’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ६५ कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने भारतात ८४.७८ कोटी आणि जगभरात ११४.५० कोटी रुपयांची कमाई केली होती.
तेलुगू लेखक-दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या भगवंत केसरी या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला तेलुगूमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आणि तेलंगणा राज्य गद्दर पुरस्कारांमध्ये तिसरा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
दोन्ही चित्रपटांमध्ये साम्य
तुम्ही जर थलपती विजयच्या ‘जन नायकन’चा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला त्यात व ‘भगवंत केसरी’च्या कथेत सारखेपणा दिसून येईल. ‘जन नायकन’ हिंदीत ‘जन नेता’ नावाने रिलीज केला जाणार आहे. यात मुलीचं नावदेखील भगवंत केसरीप्रमाणे विजी आहे. तर, भगवंत नेलकोंडा ऐवजी विजयचं नाव वेत्री कोंडन आहे.
जन नायकनचा ट्रेलर
अचानक का ट्रेंडिंग आहे ‘भगवंत केसरी’?
‘भगवंत केसरी’ ट्रेंडिंग असण्याचं कारण म्हणजे थलपती विजयचा नवीन चित्रपट ‘जन नायकन’ होय. राजकारणात पूर्णवेळ एंट्री करण्यापूर्वीचा हा तमिळ सुपरस्टार विजयचा शेवटचा चित्रपट आहे. जन नायकन शुक्रवारी ९ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जन नायकनची कथा भगवंत केसरीपासून प्रेरित आहे, अशी चर्चा होती. पण जन नायकनचा ट्रेलर आल्यावर यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. पण हा चित्रपट कोणत्याही चित्रपटापासून प्रेरित नसल्याचं जन नायकनचे दिग्दर्शक एच. विनोद यांनी स्पष्ट केलं आहे. याच चर्चेचा फायदा भगवंत केसरीला झाला असून तो ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.
भगवंत केसरीचा ट्रेलर
‘भगवंत केसरी’ सिनेमा कुठे पाहायचा?
नंदमुरी बालकृष्ण, श्रीलीला, काजल अग्रवाल व अर्जुन रामपाल यांचा ‘भगवंत केसरी’ हा चित्रपट प्राइम व्हिडीओ व जिओ हॉटस्टार या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही तो हिंदीमध्येही पाहू शकता. या चित्रपटाला आयएमडीबीवर फक्त ५.८ रेटिंग मिळाले होते.
