Navjot Singh Sidhu Praise Malaika Arora : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे कपिल शर्माचा The Great Indian Kapil Show. यात नवज्योतसिंग सिद्धू आणि अर्चना पूरण सिंगही आहेत. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अशातच नुकत्याच भागात रवी किशन, ऑरी आणि मलायका अरोरानं खास हजेरी लावली होती.

नवज्योतसिंग सिद्धू आणि मलायका यांची खास मैत्री आहे. त्यांच्या मैत्रीवरून कपिल शर्मा त्यांची मस्करीदेखील करत असतो. याचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दोघांनी याआधी India’s Got Talent च्या ११ व्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम केले होते. अशातच दोघे The Great Indian Kapil Show च्या नुकत्याच झालेल्या भागात पुन्हा एकत्र पाहायला मिळाले. दोघांनीही एकमेकांचे मनापासून कौतुक केले. विशेष म्हणजे, सिद्धू यांनी मस्करीच्या अंदाजात मलायकाबरोबर त्यांच्या मजेशीर अंदाजात फ्लर्टही केल्याचे पाहायला मिळाले.

मलायका अरोरा मोठी स्टार असली तरी…

कपिल शर्मानं नवज्योतसिंग सिद्धू यांना विचारले की त्यांना मलायकाबद्दल सर्वात जास्त काय आवडतं. त्यावर नवज्योतसिंग म्हणाले, “ती खूप मोठी स्टार असली तरी तिचे पाय जमिनीवरच आहेत. इतकी साधी सेलिब्रिटी मी क्वचितच पाहिली आहे. याशिवाय ती तिच्या कामाची शिस्तही पाळते. ती आपला दिनक्रम वेळेप्रमाणे व्यवस्थित पाळते.”

यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी मलायकाला मिठी मारत “मलायका एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. यासाठीच ती मला आवडते. तिने ठरवलं तरी हे प्रेम कमी होऊ शकत नाही” असं म्हटलं. नवज्योतसिंग यांच्या प्रेमळ बोलण्याने मलायकालादेखील आनंद झाला.

नवज्योतसिंग सिद्धू प्रामाणिक अन् दिलदार…

पुढे मलायकानेही नवज्योतसिंग सिद्धू यांचं कौतुक करत म्हटलं, “मी त्यांना ‘सिद्धूजी’ नाही तर ‘शेरी’ म्हणते. ते खूप प्रामाणिक आणि दिलदार मनाचे आहेत. एकत्र शूटिंग करताना मी त्यांच्याकडून आयुष्य आणि क्रिकेटबद्दल अनेक गोष्टी शिकले.” ती पुढे म्हणाली, “लोक म्हणतात की, एका वयानंतर नवीन मित्र मिळत नाहीत. पण मला ‘शेरी’ (नवज्योतसिंग सिद्धू) सारखा खरा मित्र मिळाला आहे.”

कार्यक्रमादरम्यान कपिलने मलायकाला विचारलं, “आयुष्यात चांगलं असणं महत्त्वाचं की थोडं खट्याळ असणं?” त्यावर नवज्योतसिंग सिद्धू यांनी लगेच “मलायका मॅडम खूप खट्याळ आहेत, किती ते मी सांगूही शकत नाही” असं उत्तर दिलं. यावर कपिलनंही मजेत मलायकाच्या आईलादेखील तिच्याबद्दल इतकं माहिती नसेल, जितकं सिद्धूंना माहीत आहे, असं उत्तर दिलं.

दरम्यान, The Great Indian Kapil Show चा हा चौथा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कार्तिक आर्यन आणि राणी मुखर्जीसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. अशातच नुकत्याच एका भागात मलायकानं ऑरी आणि रवी किशनसह हजेरी लावली. सध्या हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो.