Sumukhi Suresh Netflix Standup Show Hormonal: अभिनेत्री व कॉमेडियन सुमुखी सुरेश सध्या नेटफ्लिक्सवरील ‘होमोनल’ या तिच्या स्टँड-अप शोमुळे चर्चेत आहे. सुमुखी नागपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. १० वर्षांपेक्षा जास्त काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर, आवड असल्याने कॉमेडियन व्हायचा निर्णय घेणं तिच्यासाठी कठीण होतं. आता सुमुखीने संघर्ष, रिलेशनशिप्स याबद्दल भाष्य केलंय.
५० हजार रुपये घेऊन मुंबईत आलेली सुमुखी सुरेश
सुमुखी ५०,००० रुपये घेऊन मुंबईत आली होती. “इतरांप्रमाणेच मलाही संघर्ष करावा लागला. नेहमीच पैशांची अडचण असायची, कारण मी थोड्या भ्रमात होते. मी फक्त ५० हजार रुपये घेऊन मुंबईत आले होते. मला वाटलं होतं की मी या पैशांत ३-४ महिने सहज काढेन. पण माझा तो विचार खूपच हास्यास्पद होता, कारण मुंबईत एवढे पैसे एका आठवड्यातही खर्च होऊ शकतात. पैसे कमावणं आणि मुंबईत टिकून राहणं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती,” असं सुमुखी म्हणाली.
कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडली – सुमुखी सुरेश
सुमुखी पुढे म्हणाली, “मी १० वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. पण तिथे मला काहीतरी अपूर्ण वाटत होतं, म्हणून मी इम्प्रॉव्ह, स्टँड-अप आणि स्केच कॉमेडी करायला सुरुवात केली. हळूहळू काम खूप वाढलं आणि मला कॉमेडीला एक संधी द्यायची होती, म्हणून मी मुंबईला आले. त्या निर्णयाचे परिणाम मला आता समजत आहेत. मला आता जाणवतं की मी एक खूप मोठा निर्णय घेतला होता.”
नात्यांमधील अपयशाबद्दल सुमुखी सुरेश
‘होमोनल’ या स्टँड-अप शोच्या रंजक नावामागील गोष्ट सांगत सुमुखी म्हणाली, “नात्यांच्या बाबतीत मी कशी अपयशी ठरले, हेच या नावातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. माझं संगोपन खूप पारंपरिक पद्धतीने झालंय. डेटिंग करणं आमच्या संस्कृतीचा भाग नव्हतंच. मी एका व्यक्तीबरोबर १० वर्षे नात्यात होते आणि मी लग्न करायलाही तयार होते. पण त्या व्यक्तीला सोडून स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करावं लागेल हे समजून घेणं माझ्यासाठी खूप कठीण होते, कारण या गोष्टी मला कधी शिकवल्याच गेल्या नव्हत्या.”
या शोमध्ये सुमुखीने नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या टोमण्यांबद्दलही सांगितलं. “माझा आणि माझ्या नातेवाईकांचा स्वभाव खूप वेगळा आहे. त्यांच्यात आणि माझ्यात काहीच साम्य नाही. जेव्हा मी नोकरी सोडून कॉमेडियन म्हणून काम करू लागले, तेव्हापासूनच मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. मी कुणाच्या लग्नाला जात नाही, मला चुलत भावंडांचे चेहरे आठवत नाही. मी फक्त माझ्या आईचंच ऐकते आणि तिचेच टोमणे सहन करू शकते,” असं सुमुखी सुरेशने नमूद केलं.
